बोटांचा चेंदामेंदा
By Admin | Updated: May 20, 2017 01:03 IST2017-05-20T01:03:08+5:302017-05-20T01:03:08+5:30
उभ्या असलेल्या मालगाडी खालून पलीकडे जातांनी एका इसमाची चार बोटे मालगाडीच्या चाकाखाली आली.

बोटांचा चेंदामेंदा
इसम बचावला : तुमसर येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : उभ्या असलेल्या मालगाडी खालून पलीकडे जातांनी एका इसमाची चार बोटे मालगाडीच्या चाकाखाली आली. बोटांचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला. नशिब बलवत्तर म्हणून तो सुदैवाने बचावला. सध्या त्याच्यावर भंडारा येथे उपचार सुरु आहे. त्या इसमाचे नाव हल्दीराम उग्रासे (५०) रा. नेहरु वॉर्ड देव्हाडी असे आहे. ही घटना गुरुवारी रात्री १०.३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकावर घडली.
हल्दीराम उग्रासे तुमसर रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर उभ्या असलेल्या मालगाडी खालून पलीकडे जात होता. तितक्यात मालगाडी सुरु झाली.
घाबरलेल्या उग्रासेने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. त्याची उजव्या हाताची चार बोटे चाकाखाली सापडली. हात तात्काळ ओढल्याने त्याचा चारही बोटांचा चेंदामेंदा झाला.
स्टेशनमास्तर सिंग रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी रमेश यादव, नारायण यांनी जखमी हल्दीराम उग्रासे याला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेले. प्राथमिक उपचारानंतर उग्रासे यांना भंडारा येथे रेफर करण्यात आले.
तुमसर रोड रेल्वे स्थानकावर मागील अनेक दिवसापासून मालवाहतूक गाड्यांचा थांबा आहे. अनेक दिवसापासून गाड्या उभ्या असल्याने स्थानिक नागरिक गाडीखालून सरसकट जातात. त्यामुळे अपघात होण्याची अधिक शक्यता असते. प्रवाशांनी तथा स्थानिक नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पादचारी पूलावरुन प्रवास करावा असे आवाहन स्टेशन मास्तर एन. सींग यांनी केले आहे.