सावित्रीच्या त्यागाची चंद्रपूर जिल्ह्यात फलश्रुती
By Admin | Updated: September 22, 2014 23:15 IST2014-09-22T23:15:38+5:302014-09-22T23:15:38+5:30
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये देशात शेकडो वर्षे महिलांना चार भिंतीआड ठेवले जात होते. त्यामुळे महिलांना समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते. मात्र सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून आज अनेक महिला

सावित्रीच्या त्यागाची चंद्रपूर जिल्ह्यात फलश्रुती
राजकुमार चुनारकर - खडसंगी
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये देशात शेकडो वर्षे महिलांना चार भिंतीआड ठेवले जात होते. त्यामुळे महिलांना समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते. मात्र सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून आज अनेक महिला प्रशासकीय सेवेसह सत्तेची फळे चाखत आहेत. जिल्ह्यातील १५ पंचायत समितीपैकी अकरा पंचायत समितीवर महिलांनी कब्जा केला आहे. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी विराजमान होऊन त्या मिनी मंत्रालयाचा डोलारा सांभाळणार आहेत.
जाती व्यवस्थेने बरबटलेल्या देशात उच्च-नीचतेची दरी मिटवून समानता आणण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज अशा अनेक समाज सुधारकांना अतोनात कष्ट उपसावे लागले. मानवाची प्रगती कशामध्ये आहे हे महात्मा फुले यांनी चागलेच ज्ञात होते.
त्यामुळे त्यांनी बहुजनसाठी शाळा सुरू केल्यात व सावित्रीबाई फुले यांना शिकवून पहिली शिक्षिका बनविले. यासाठी त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित ठेवलेल्या महिलांच्या प्रगतीकरिता कुणीच पुढे आले नाही. मात्र फुले दाम्पत्यांनी महिलाच्या अधिकारासाठी संघर्ष उभारुन महिलांना शिक्षणाची दारे उघडून दिली. महिलांना शिकविण्याकरिता स्वत: सावित्रीबाई फुलेंना शिव्या खाव्या लागायच्या. मात्र या सर्व प्रकाराला न घाबरता सावित्रीने शिक्षणाचा दिवा घरोघरी लावण्यासाठी संघर्ष केला व सावित्रीने लावलेले त्याकाळातील रोपटे आज एकविसाव्या शतकात फळाने बहरले आहे. त्यामुळे अनेक महिला प्रशासकीय सेवेसह राजकारणात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.
मिनि मंत्रालयात काल रविवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून संध्या गुरुनुले तर उपाध्यक्ष म्हणून कल्पना बोरकर या मिनी मंत्रालयाच्या कारभारणी बनल्या. यासह जिल्ह्यातील बल्लारपर, राजुरा, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, भद्रावती, मूल, सावली, गोंडपिपरी, जिवती व चिमूर पंचायत समितीवरही महिलाच सभापती बनून कारभार चालवित आहेत. शेकडो महिला ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून न्याय व्यवस्थेत सहभाग घेऊन यंत्रणा चालवित आहेत.
पुरुषप्रधान संस्कृतीत चूल आणि मूल सांभाळून संसारात मर्यादीत असलेली स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीला आता बगल देऊन पुढे निघाली आहे. आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुलेंनी महिलाच्या प्रगतीबाबत बघितलेले स्वप्न आता चंद्रपूर जिल्ह्यात तरी पूर्ण झालेले दिसत आहे.(वार्ताहर)