बनावट बीपीएल शिधापत्रिकांची चौकशी
By Admin | Updated: June 3, 2016 00:34 IST2016-06-03T00:34:07+5:302016-06-03T00:34:07+5:30
गावात खोट्या सन्मानासाठी स्थानिक पुढारी एकमेकांच्या उचापती करतात. त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागतो

बनावट बीपीएल शिधापत्रिकांची चौकशी
मोहाडी : गावात खोट्या सन्मानासाठी स्थानिक पुढारी एकमेकांच्या उचापती करतात. त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागतो. असा काहीसा प्रकार देव्हाडा खुर्द या गावात होत आहे. दोन गटानी वर्चस्वासाठी बोगस शिधापत्रिकाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार तहसिलदार मोहाडी यांचेकडे केली आहे.
राजकारणात लाभ घेण्यासाठी पुढारी एकाचे दोन करतात. देव्हाडा खुर्द येथेही असेच घडले आहे. तत्कालीन सरपंचानी आपल्या प्रभावाने बोगस बीपीएलचे कार्ड तयार केले. नियमात बसत नसतानाही सधन लोक याचा लाभ घेत होते. सगळं काही गावात सुरळीत असताना गावातील एका पक्षाचा नेता स्थानिक सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराच्या पाठीमागे लागला.
गावात धान्य उचलण्यासाठी बीपीएल लाभधारकांना मनाई केली. सातत्याने दुकान जोडणे-काढणे प्रकार चालत राहिला. या प्रकाराने गावात सरळ दोन गट पडले. एका गटाने तब्बल ८४ बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाची चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचेकडे तक्रार केली. नंतर दुसऱ्या गटाने २२ कार्डधारकांची चौकशी करावी, असे पत्र दिले. यामुळे तहसिलदार मोहाडी यांनी चौकशीचे आदेश काढले. मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील यांची चौकशी समिती बसविण्यात आली आहे.
देव्हाडा खुर्द येथील १०६ बोगस बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाची चौकशी करावी, असे समितीला निर्देश दिले. बनावट शिधापत्रिकासंबंधी अहवाल सादर करण्याचेही समितीला सांगण्यात आले. चौकशी समिती नेमून महिना झाला. अजुनपर्यंत अन्न पुरवठा शाखेला चौकशी अहवाल आला नाही.
तथापि, वारंवार देव्हाडा खुर्द येथे एका स्वस्त धान्य दुकानावर वाद विकोपाला गेले. या वादावर कायमचा प्रश्न प्रशासनाने मिटवला आहे. देव्हाडा खुर्द येथे पुन्हा एक वाढीव स्वस्त धान्य दुकान देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले. १०६ बोगस बीपीएल शिधापत्रिकांची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल त्याचे खापर गावकरी स्थानिक नेत्यांवर फोडणार आहेत.
दहा गावात
रास्तभाव दुकाने मंजूर
जांभोराटोला, लेंडेझरी, जांभळपाणी, बोंडे, बिटेखारी, दवडीपर, पांजरा फुटाळा, देव्हाडा (खुर्द) धर्मापुरी या दहा गावात स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्यात आले आहे.( तालुका प्रतिनिधी)