अल्पभूधारक शेतकऱ्याची भाजीपाला उत्पादनात भरारी
By Admin | Updated: August 10, 2015 00:21 IST2015-08-10T00:21:19+5:302015-08-10T00:21:19+5:30
जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाची कास धरत अल्पभूधारक शेतकऱ्यांनी अर्धा एकर पडीक जागेत भाजीपाला उत्पादनाची लागवड केली.

अल्पभूधारक शेतकऱ्याची भाजीपाला उत्पादनात भरारी
प्रेरणादायी : अर्धा एकरात भेंडी, वांगे, लौकीची लागवड
रंजीत चिंचखेडे चुल्हाड(सिहोरा)
जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाची कास धरत अल्पभूधारक शेतकऱ्यांनी अर्धा एकर पडीक जागेत भाजीपाला उत्पादनाची लागवड केली. यात भरघोस उत्पादनाने अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ठरले आहे. ब्रिजलाल बनकर (४०) रा.ब्राह्मणटोला असे प्रेरणा देणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
अभ्यास केंद्राच्या माध्यमातून शासकीय सेवेत सर्वाधिक तरुणांना सुवर्ण संधी उपलब्ध करून देणाऱ्या महालगाव (ब्राह्मणटोला) या गावाचे नाव अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आले आहे. या गावात पडीक जागेत भाजीपाला उत्पादनात उत्तुंग भरारी एका गरीब शेतकऱ्याने घेतल्याचे पुन्हा या गावाने मानाचा तुरा रोवला आहे. बावनथडी नदी काठालगत १,२०० लोकवस्तीच्या ब्राम्हणटोला गावात बहुतांश शेतकरी कुटुंबाचे वास्तव्य आहे. या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. गाव शेजारी असणाऱ्या अर्धा एकर पडीक शेतीत भाजीपाला उत्पादनाचा निर्णय आठवी पास शेतकरी ब्रिजलाल बनकर यांनी घेतला. या जागेची आधी त्यांनी मशागत केली. पत्नी छाया या १० वी उत्तीर्ण असल्याने त्यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम पती ब्रिजलालला लाभले. गावातील शेतकरी रमेश विठुले यांचे सान्निध्यात ब्रिजलाल आल्याने तंत्रज्ञान व लागवड पद्धतीची माहिती मिळाली. हा पडीक जागेत पहिलाच प्रयोग असल्याने उत्पादन खर्च वाढत गेल्याने संपूर्ण कुटुंब तणावात होते, परंतु ब्रिजलालने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. यात या शेतकऱ्याने परिश्रमाची कास जोडली. अर्धा एकर जागेत भेंडी, वांगे आणि लौकीची लागवड केली. या भाजीपाला उत्पादनाने भरघोस पिकांकडे वाटचाल केल्याने ब्रिजलालच्या चेहऱ्यावर आनंदाचे चित्र निर्माण झाले. प्रथमत: गावात आणि परिसरात अशा उत्तुंग भरारी भाजीपाला पिकांची चर्चा पंचक्रोशीत गेली. अनेक शेतकऱ्यांनी ब्रिजलालच्या शेतशिवारात प्रत्यक्ष भेट देऊन लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली. ब्रिजलाल बनकर म्हणाले, अर्धा एकर जागेत भाजीपाला लागवडीतून खर्चापेक्षा अधिक नफा प्राप्त झाला आहे. या उत्पादनाने नवा जोश निर्माण केला आहे. पारंपरिक धान उत्पादनासोबत शेतकऱ्यांनी भाजीपाला व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.