मगरला पकडण्यात चौथ्या दिवशीही वनविभागाला अपयश
By Admin | Updated: November 19, 2014 22:34 IST2014-11-19T22:34:26+5:302014-11-19T22:34:26+5:30
तालुक्यातील चप्राड येथील तलावात मगर आढळून आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडण्यासाठी चार दिवसापासून शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु हे प्रयत्न अपुरे पडत असून

मगरला पकडण्यात चौथ्या दिवशीही वनविभागाला अपयश
लाखांदूर : तालुक्यातील चप्राड येथील तलावात मगर आढळून आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडण्यासाठी चार दिवसापासून शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु हे प्रयत्न अपुरे पडत असून या मगरीला काढण्यासाठी दररोज बघ्यांची संख्या वाढत आहे. परंतु ही मगर आढळून आल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात पसरलेला चप्राड तलाव पाण्याने तुडूंब भरलेला आहे. या तलावात महिला कपडे धुणे, जनावरांना पाण्यात सोडणे, इतकेच नव्हे तर शाळकरी मुले आंघोळीचा आनंद लुटतात. परंतु पाच दिवसापूर्वी या तलावात भलीमोठी मगर आढळून आल्याने नागरिकांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या मगरीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले.
मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली त्यामुळे वनविभागने पोलिसांना बोलाविले. घटनास्थळी कुठलिही जीवितहाणी होऊ नये, यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी तडस व पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांनी बंदोबस्त तैनात केला आहे. चार दिवसापासून मगरीला पकडण्यासाठी कोळी समाजाच्या लोकांना हाताशी धरून शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र चौथ्याही दिवशीही मगरीला पकडण्यात अपयश आले आहे. दररोज हजारो नागरिकांची गर्दी होत असल्याने या ठिकाणाला जत्रेचे रूप आले. कोळी समाजाच्या लोकांनी तलावात जाळे पसरविले मगर जाळ्यात अडकला मात्र तलावात पाणी भरपूर असल्यामुळे पकडता आले नाही.
तलावाला लागूनच वसाहत असल्याने पोलीस व वनकर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मगराच्या सभोवताल जाळे पसरविण्यात आले आहे. या तलावात मच्छीमार सोसायटीने लाखोचे मासे सोडलेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये भिती निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)