शिक्षकांनी कालसंगत ज्ञानसमृद्ध व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:47 IST2017-11-25T23:47:00+5:302017-11-25T23:47:26+5:30
नाविण्यपूर्ण पिढी घडवून आणण्याची क्षमता प्रत्येक शिक्षकांमध्ये आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

शिक्षकांनी कालसंगत ज्ञानसमृद्ध व्हावे
ऑनलाईन लोकमत
मोहाडी : नाविण्यपूर्ण पिढी घडवून आणण्याची क्षमता प्रत्येक शिक्षकांमध्ये आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. बदलत्या काळातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेत प्रत्येक शिक्षकांनी गतीने ज्ञानसमृद्धी केली जावी असे प्रतिपादन मोहाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी केले.
पंचायत समिती मोहाडीच्या सभागृहात सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास प्रशिक्षण अविरत या नावाने आयोजित करण्यात आले होते. अविरत प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर गट शिक्षणाधिकारी रमेश गाढवे, मुख्याध्यापक दयाळनाथ माळवे, यशोदा येळणे, प्रकाश करणकोटे, हिंमत तायडे, वसंत मारवाडे, राज्यतज्ञ मार्गदर्शक राजकुमार बांते, श्रीराम काळे यांची मंचावर उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास प्रशिक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट करणारा अविरत व्हीडीओ दाखविण्यात आला. यामुळे विकास प्रशिक्षण कसे होणार हे समजण्यात आले.
प्रशिणाबाबत शंकाचे निरसण करण्यात आले. उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वत:बद्दल बलस्थान व सुधारणा करायची गरज याबाबत माहिती दिली. शिक्षकांची प्रेरणा कमी झाली काय याबाबत त्याची कारणे यावर चर्चा झाली. प्रशिक्षणार्थीकडून प्रेरणा प्रश्नावली सोडविण्यात आली. किशोरवयीन विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक म्हणून काम करताना जाणविणाºया समस्यांवर गटचर्चा करण्यात आली. स्व. विकास व कलारसास्वाद या पुस्तकातील विषय व त्याची गरज यावर चर्चा घडवून आणण्यात आली. तसेच महाकरिअर मित्र पोर्टलची ओळख करून देण्यात आली.
या पोर्टलचा व कल चाचणीचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कसा फायदा होऊ शकेल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक राजकुमार बांते, श्रीराम काळे यांच्यासह मुकरण कुर्जेकर, संजय वासनिक यांनीही मार्गदर्शन केले. विविध गटचर्चेत वर्षा देशभ्रतार, यशोदा येळणे, हिंमत तायडे, प्रकाश करणकोटे, अतुल बारई, दयालनाथ माळवे यांनी भाग घेतला. प्रशिक्षणाचे समारोप गट शिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.