नेत्र शस्त्रक्रियाधारकांना प्रतीक्षा मोफत चष्म्याची
By Admin | Updated: April 11, 2015 00:40 IST2015-04-11T00:40:34+5:302015-04-11T00:40:34+5:30
कांद्री परिसरातील नागरिकांवर प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगांव व जांबच्या अधिनस्थ सहा महिन्यापूर्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली.

नेत्र शस्त्रक्रियाधारकांना प्रतीक्षा मोफत चष्म्याची
असंतोष : सहा महिन्यांपासून पुरवठा नाही
जांब (लोहारा) : कांद्री परिसरातील नागरिकांवर प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगांव व जांबच्या अधिनस्थ सहा महिन्यापूर्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिया करणाऱ्यांना अजूनही चष्म्याचे वितरण करण्यात आलेले नाही.
शालेय विद्यार्थी, वृध्दांना जिल्हा सामान्य नेत्र चिकित्सालयाकडून चष्मे पुरवठा करण्यात यायला पाहिजे होते. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही चष्मे वाटप झाले नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. नेत्राचा आजार असलेल्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जांब, आंधळगाव मार्फत जिल्हा सामान्य नेत्र चिकित्सालय भंडारा येथे चार महिण्यापुर्वी डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अजुनपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयकडून चष्मे देण्यात आलेले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथे नेत्र तपासणी करण्याकरिता येणाऱ्या नेत्र तज्ज्ञाला चष्म्यासंदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून जांब, आंधळगाव, कांद्री परिसरातील शस्त्रक्रिया धारकांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयाने चष्म्याचे वितरण करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी यांनी केली आहे. (वार्ताहर)
शासनाकडून पाच ते सहा महिन्यांपासून चष्म्यांचा पुरवठा झाला नाही. यामुळे चष्मा वाटपात अडचणी निर्माण होत आहे.
- डॉ. लक्ष्मण फेगडकर,
नेत्र तज्ज्ञ,
जिल्हा सामान्य रुग्णालय, भडारा