‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त
By Admin | Updated: April 29, 2016 00:37 IST2016-04-29T00:37:45+5:302016-04-29T00:37:45+5:30
तालुक्यतील आष्टी येथील उपकेंद्रात दोन महिन्याच्या गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली.

‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त
गर्भवती महिला कुटुंब नियोजन प्रकरण : जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून कासवगतीने चौकशी
तुमसर : तालुक्यतील आष्टी येथील उपकेंद्रात दोन महिन्याच्या गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी भंडारा जिल्हा आरोग्य विभागाकडून कासवगतीने चौकशी सुरू आहे. ३ मे रोजी जिल्हास्तरीय मेडिकल बोर्डाची बैठक लावण्यात आली आहे. या समितीत तज्ज्ञांचा समावेश आहे. महिन्यातून एकदा या समितीची बैठक होते, पंरतु आष्टी येथील प्रकरण गंभीर असल्याने बैठक लवकर घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आष्टी उपकेंद्रात दोन महिन्याच्या गर्भवती महिलेची कुटूंब शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेच्या तपासणी सोपस्कार पार पाडल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनीच गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केली. २३ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे आरोग्य विभाग खळबळून जागा झाला.
२६ एप्रिलला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र पातुरकर यांची भेट घेऊन आष्टी येथील प्रकरणाची चर्चा केली. ३ मे रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हास्तरीय मेडीकल बोर्डाची बैठक निश्चित करण्यात आली या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक प्रसुती तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. आष्टी येथील प्रकरणाची सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी चौकशी केली आहे.
संपुर्ण माहिती अहवाल मेडीकल बोर्डासमोर ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत असल्याने आरोग्य विभाग येथे सावध पावले उचलत असल्याचे दिसून येते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तपासणी व चौकशी येथे सुरू होती, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)