सेवकांवर सव्वातीन लाखांचा खर्च
By Admin | Updated: July 3, 2014 23:25 IST2014-07-03T23:25:49+5:302014-07-03T23:25:49+5:30
बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीचे जवळपास दीड लक्ष सेवक आहेत. त्यापैकी भ्रमंतीवर गेलेल्या काही सेवकांच्या जत्थातील एका सुमी गाडीला दुर्दैवाने अपघात झाला.

सेवकांवर सव्वातीन लाखांचा खर्च
दुर्दैवी अपघात : पत्रपरिषदेत दिली माहिती
मोहाडी : बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीचे जवळपास दीड लक्ष सेवक आहेत. त्यापैकी भ्रमंतीवर गेलेल्या काही सेवकांच्या जत्थातील एका सुमी गाडीला दुर्दैवाने अपघात झाला. त्यातील जखमींवर गेलेल्या इतर सेवकांनी मिळून त्यांच्या उपचारावर ३ लक्ष २३ हजार रुपयांचा खर्च केला. तसेच त्यांची सेवासुश्रुषा केली. मात्र काही विरोधकांनी खोटी अफवा पसरवून सेवकांसेवकात भांडणे लावली, अशी माहिती आयोजित पत्रपरिषदेत ब.ऊ. परमात्मा एकसेवक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी दिली.
मोहाडी येथून परमात्मा एक सेवक मंडळाच्या ७० सेवकांचा जत्था आठ सुमो गाड्याद्वारे भारत भ्रमणासाठी २१ मे रोजी गेला होता. त्यापैकी एका गाडीचा राजस्थान येथील उदयपूर जवळ ७ जूनला अपघात झाला. या अपघातात ५ सेवक जखमी झाले. पैकी एका जणाचा एक-दोन तासातच मृत्यू झाला. त्यामुळे चांगल्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयातून काढून खाजगी रुग्णालयात चार जखमींना भरती केले गेले.
सर्व सेवकांनी पुढचा दौरा रद्द करुन सर्व सेवक जखमींच्या सेवेत लागले. मात्र ८ जुनला दुसऱ्या जखमीचाही मृत्यू झाला. पोलीस कारवाईमुळे दोन्ही मृतकांचा शवविच्छेदन ८ जूनला करण्यात आला. संपूर्ण कारवाई झाल्यानंतर दोन्ही मृतदेह चार-पाच सेवकांसोबत २४ हजार रुपये किरायाच्या अॅम्बुलन्सद्वारे त्यांच्या स्वगावी पाठविण्यात आले. तसेच तेथील खाजगी रुग्णालयात मानकर व दोन महिला यांच्या उपचारावर २ लक्ष ४० हजार रुपये खर्च करण्यात आले. परिस्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात आल्यावर मानकर व दोन महिलांना वातानुकुलीत एम्बुलन्सद्वारे ५९ हजार रुपये किराया देऊन नागपूर येथे पाठविण्यात आले. अपघातग्रस्त सुमो गाडीला सोडविण्यासाठी तसेच पोेलीस कारवाई पूर्ण करण्यासाठी काही सेवकांना तेथेच थांबावे लागले. नागपूरजवळ आले असतानाच मानकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना माधवबाग रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारादरम्यान त्यांंचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त सेवकासाठी एवढे परिश्रम घेऊनही काही विरोधकांनी जखमी सेवकांना तसेच सोडून पुढे फिरायला गेले अशी अफवा मोहाडी व परिसरात पसरवून असंतोष पसरविला. त्यामुळे परमात्मा एक मंडळाच्या सेवकात भ्रम निर्माण झाला. ब.ऊ. परमात्मा एक मंडळ मोहाडीच्या भवनात रविवार व गुरुवारला होणारी चर्चा बैठक तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली आहे. सध्या शेतीचा हंगाम असून अनेक सेवक शेतीच्या कामात व्यस्त आहेत. तसेच भ्रमंतीवर गेलेल्या सेवकांच्या अपघातामुळे झाालेला गैरसमज सेवकांना पटवून देण्यापर्यंत ही बैठक रद्द करण्यात आली आहे. मात्र यालाही राजनीतिक रंग देण्याचा प्रयत्न होत आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले, सचिव मोरेश्वर सार्वे यांनी दिली असून लताताई बुरडे यांच्या अंगात बाबा येत नाही असा खुलासाही केला आहे. त्या चार तत्व, तीन शब्द, पाच नियम या बाबांच्या आत्मबोलाचा प्रचार व प्रसार करतात असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला लताताई बुरडे, नवीन भैसारे, मंडळाचे सर्व सदस्य तथा अनेक सेवक उपस्थित होेते. (शहर प्रतिनिधी)