ग्राहकाला राजत्व प्राप्त करून देण्यासाठी चळवळ विस्तारित करावी
By Admin | Updated: November 20, 2014 22:47 IST2014-11-20T22:47:15+5:302014-11-20T22:47:15+5:30
ग्राहक हा राजा आहे आणि त्याला राजत्व प्राप्त करून देण्यासाठी शासकीय यंत्रणेतील त्रृटी दूर करण्यासाठी ग्राहकशक्ती, दंड आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्यानेच ग्राहक चळवळ विस्तारित करता येईल,

ग्राहकाला राजत्व प्राप्त करून देण्यासाठी चळवळ विस्तारित करावी
भंडारा : ग्राहक हा राजा आहे आणि त्याला राजत्व प्राप्त करून देण्यासाठी शासकीय यंत्रणेतील त्रृटी दूर करण्यासाठी ग्राहकशक्ती, दंड आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्यानेच ग्राहक चळवळ विस्तारित करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी केले.
ग्राहक चळवळ ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सुर्यकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, बी.के. आरीकर, स्मिता नार्टन उपस्थित होत्या.
यावेळी सुर्यकांत गवळी यांनी प्रत्येक विभागांच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र ही ग्राहक चळवळीची जन्मभूमी आहे. तरीही ही चळवळ ग्राहकांपर्यंत अद्याप पोहचली नाही. त्यासाठी ग्राहक चळवळीचे स्वतंत्र खाते करावे त्याच बरोबर ग्राहक सचिव आणि या खात्यासाठी वेगळ्या बजेटची तरतूद करावी. चांगले काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच व्यक्ती व संस्थांचा शासनाने पुरस्कार देवून गौरव करावा. ग्राहक कल्याण नवनीत ही पुस्तिका शासकीय यंत्रणेमार्फत घराघरापर्यंत पोहचावी. या मागण्या शासनस्तरावर मांडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यानंतर ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी बैठक घेवून ग्राहकांसदर्भातील तक्रारी व सूचना तसेच त्यावर उपाय योजना संबंधी चर्चा केली. यावेळी ग्राहक समितीचे अध्यक्ष धनंजय मुलकलवार, ग्राहक पंचायतीचे सदस्य प्रेमराज मोहोकार, श्रीमती सातोरकर, अविनाश बालपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, उपनिबंधक अजय कडू तसेच ग्राहक संघटनाचे प्रतिनिधी, राशन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष संजय भांबोरे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)