मालगुजारी तलावांचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: March 15, 2016 01:01 IST2016-03-15T01:01:29+5:302016-03-15T01:01:29+5:30
जिल्हा जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर जिल्हा परिषदेच्या

मालगुजारी तलावांचे अस्तित्व धोक्यात
भंडारा : जिल्हा जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या नियंत्रणात असलेल्या मामा तलावांचे अस्तित्व अतिक्रमणामुळे धोक्यात आले आहे.
एकेकाळी बाराही महिने तुडूंब राहणारे तलाव आता केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एवढेच नाहीतर अनेक तलाव बेपत्ता झाले आहेत. काही तलाव सोडले तर कोणत्याही तलावात पाहिजे त्या प्रमाणात पुरेसे पाणी दिसून येत नाही. जिल्ह्यात पुरातन काळापासून मालगुजारी तलाव आहेत. त्यामुळेच हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्यास्थितीत जिल्हयातील मालगुजारी तलावांची परिस्थिती पाहिली तर, हे मालगुजारी तलाव मातीने भरण्यासोबतच अतिक्रमणामुळे प्राचीन वारसाचे अस्तित्व संकटात आल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेकडून लक्ष देण्यात न आल्यामुळे मालगुजारी तलावांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बांध तसेच तलाव एकतर मातीने भरण्यात आले किंवा अतिक्रमण करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमधील बोडी व तलाव मातीने बुजवून सपाट करण्यात आले. यानंतर तेथे भूखंड पाडून त्यांची विक्री सुद्धा करण्यात आली आणि त्यावर आता अनेक वसाहती तयार झालेल्या आहेत. मालगुजारी तलाव लुप्त होण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील तलावांवर वाढते अतिक्रमण तसेच प्राचीन मालगुजारी तलावांकडे लक्ष न दिल्यामुळे तलावांची जलक्षमता कमी झालेली आहे. जिल्ह्यात जवळपास ६० टक्के तलाव असे आहेत, जे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर विसंबून आहेत. अनेक तलाव तर पूर्णत: बुजून गेले व त्यांच्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही वर्षांत मालगुजारी तलावांचे अस्तित्वच नष्ट होईल, यात शंका नाही.
मोहाडी तालुक्यातील करडी परिसर 'तलावांचा परिसर' म्हणून ओळखला जातो. वैनगंगेच्या पूर्व काठावरील शेती सुपीक असून कृषीपंपाची सोय आहे. मात्र कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्यांशी असलेला मोठा परिसर तलावांच्या सिंचनावर अवलंबून आहे. संपूर्ण क्षेत्र सिंचनाने बकाल झाला आहे. केवळ खरीप पिकांपुरते पाणी साठविण्याची क्षमता येथील तलावात आहे. मात्र ते सुध्दा मिळू शकले नाही. त्यामुळे तलावांच्या पायथ्याशी शेतीमध्ये दुष्काळाच्या मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येते. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात देव्हाडा, मोहगाव, नवेगाव, जांभळापाणी, करडी, किसनपूर, लेंडेझरी, जांभोरा, केसलवाडा, पालोरा, खडकी, ढिवरवाडा, बोंडे, डोंगरदेव आदि तालुक्यातील गावात लहान मोठ्या तलावांची संख्या अधिक आहे. याही व्यतिरिक्त परिसराला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यातील कोका, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, लोहारा, चंद्रपूर माटोरा, नवेगाव आदी गावांतही तलावाची संख्या बरीच आहे. बऱ्याच तलावांच्या गेट नादुरुस्त आहेत. तसेच तलावांच्या पाळ कमकुवत आहेत. तलाव गाळाने भरलेले असल्याने सपाट झाली आहेत. सर्व तलावांमध्ये कमीअधिक जास्त प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बऱ्याचवेळी अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलने करण्यात येतात. परंतु, काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती 'जैसे-थे' राहते आणि प्रश्न मात्र कायम राहतो. (नगर प्रतिनिधी)