कार्यकारी अभियंत्यांची अशीही ‘बनवाबनवी’
By Admin | Updated: June 9, 2016 00:39 IST2016-06-09T00:39:39+5:302016-06-09T00:39:39+5:30
माजी मालगुजारी तलावांच्या सर्वेक्षण व प्राकलण तयार करण्याबाबत जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाने निविदा सूचना प्रकाशित केली होती.....

कार्यकारी अभियंत्यांची अशीही ‘बनवाबनवी’
प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : रद्द निविदा दुरूस्ती करून पुनर्प्रकाशित
प्रशांत देसाई भंडारा
माजी मालगुजारी तलावांच्या सर्वेक्षण व प्राकलण तयार करण्याबाबत जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाने निविदा सूचना प्रकाशित केली होती. हे काम तांत्रिक असतानाही लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी सर्व काम मजूर सहकारी संस्थेला देऊ केले होते. याबाबत ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर लघू पाटबंधारे विभागाने ही निविदाच रद्द केली. सदर विभागाने ही निविदा दुरूस्ती करून पूनर्प्रकाशित केली असली तरी यात अनेक चुका आढळून येत आहे.
जिल्ह्यात १,१५४ मामा तलाव आहेत. हे तलाव जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित आहे. तलावांवर नागरिकांनी अतिक्रमण केले असून त्यातील गाळ उपसा झाला नसल्याने तलाव सपाट झाले आहे. तलावांचे खोलीकरण न झाल्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. तलावांच्या खोलीकरणासाठी निधी दिला. अनेक तलावांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने लघु सिंचन विभागाला निधी दिला आहे. त्यापैकी लघू पाटबंधारे विभागाने २२२ मामा तलावांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर ई-निविदा प्रकाशित केली होती. सर्वेक्षणाचे काम हे तांत्रिक बाब असतानाही कार्यकारी अभियंता पराते यांनी सदर सर्वेक्षणाचे काम मजूर सहकारी संस्थांना देऊ केल्याचे निविदात नमूद केले होते. ही बाब चुकीची असल्याने व निविदात अनेक त्रूट्या असल्याची बाब ‘लोकमत’ने लावून धरली. यामुळे सदर विभागाने आवरासावर करीत ई-निविदाच रद्द करून ती शासकीय संकेतस्थळावरून काढून घेतली होती.
आता कुठे गेले कामाचे रोटेशन?
प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : रद्द निविदा दुरूस्ती करून पुनर्प्रकाशित
भंडारा : लघू पाटबंधारे विभागाने ई-निविदा प्रकाशित केली होती. त्यात तांत्रिक कामे मजूर सहकारी संस्थांना देऊ केले होते. याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी बाजू मांडताना, कामांचे रोटेशन असल्याने ते मजूर सहकारी संस्थांना देत असल्याचे सांगितले होते. मात्र यात अनियमिता झाल्याचे हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर ही निविदाच रद्द करण्यात आली. आता ही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात येणार असल्याने रोटेशन कुठे गेले? असा प्रश्न उपस्थित होतो.
सदर निविदा लघु सिंचन विभागाने शासकीय संकेतस्थळावर काही दुरूस्ती करून मंगळवारला पूनर्रप्रकाशित केली आहे. सुरूवातीच्या काही चुका दुरूस्ती करून सुधारणा करण्यात आल्या. मात्र, कोणत्या गावातील तलावांचे काम करण्यात येणार आहे. याबाबत यात नमुद करण्यात आलेले नाही. याबाबत कार्यकारी अभियंता पी.एस. पराते यांच्या भ्रमणध्वनीवर दोनवेळा संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (शहर प्रतिनिधी)