आधी केले बहिष्कृत, नंतर घेतला जीव

By Admin | Updated: August 30, 2016 00:15 IST2016-08-30T00:15:46+5:302016-08-30T00:15:46+5:30

संशयाचे भूत एकदा मानगुटीवर बसले की जात नाही. याच संशयातून दावेझरी (टोला) येथील ग्रामस्थांनी ढोक दाम्पत्यांवर बहिष्कार टाकला होता.

Excluded before it, then taken creatures | आधी केले बहिष्कृत, नंतर घेतला जीव

आधी केले बहिष्कृत, नंतर घेतला जीव

प्रकरण पती-पत्नीच्या खुनाचे : आरोपींना कठोर शिक्षा करा, संशयाच्या भूताने ग्रामस्थांना झपाटले
भंडारा/तुमसर : संशयाचे भूत एकदा मानगुटीवर बसले की जात नाही. याच संशयातून दावेझरी (टोला) येथील ग्रामस्थांनी ढोक दाम्पत्यांवर बहिष्कार टाकला होता. या बहिष्कृत दाम्पत्यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. दरम्यान गावात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराची लागण होऊन दोघांचा मृत्यू झाला. आणि गावकऱ्याच्या डोक्यात संशयाचे चक्र सुरू झाले. या संशयाच्या चक्रातून ढोक दाम्पत्यांचा खून झाला.
दावेझरी (टोला) ५० ते ५५ घरांची लोकवस्ती. दगडी खाणीत मजुरी करणे हा तिथल्या लोकांचा रोजगार. हातावर आणून व पानावर खाणे असा नित्यक्रम. अशातच गावात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारामुळे घरांघरात लहान मुले, महिला व वृध्द आजारी पडले आहे. गावात घराघरात आजार असतानाही आरोग्य विभाग यापासून अनिभज्ञ आहे. थातुरमातुर औषधोपचाराने आजार बरा होण्यापेक्षा वाढला.
दरम्यान गंगाधर शेंडे यांची पत्नी सुनिता शेंडे यांचा तर मदन कुंभरे यांचा मुलगा राज कुंभरे (५) याचा २६ आॅगस्टला आजाराने मृत्यू झाला. या मृत्यूला ढोक दाम्पत्य जबाबदार असल्याचा ग्रामस्थांचा गैरसमज झाला. त्यामुळे या दाम्पत्याला ठार करण्याचा कट रचण्यात आला. सायंकाळच्या सुमारास डझनभर ग्रामस्थ ढोक यांच्या घरावर चालून गेले. घराच्या विजेचा मीटर तोडला. अन्य साहित्याची तोडफोड केली. जीवाच्या आकांताने यादोराव व पत्नी कौशल गावातील मंदिरात आश्रयाला गेले. त्यामागोमाग जमाव मंदिराच्या दिशेने चालून आला.
जमावाच्या हातात लाठ्या काठ्या होत्या. मंदिरातून बाहेर ओढून या दाम्पत्यांना चौकात नेण्यात आले. तिथे बेदम मारहाण करण्यात आली. यात यादोराव व पत्नी कौशल यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तीन किमी दूर फरफटत नेऊन दगडी खाणीच्या परिसरात मृतदेह फेकून दिला.
शनिवारला रात्री घडलेल्या या प्रकाराची रविवारला कुजबुज सुरू झाली. गावातीलच एकाकडून पोलिसांना कळले. पोलीस पोहोचले. शोधमोहीम सुरू झाली आणि अवघ्या काही वेळातच मृतदेह सापडले. त्यापाठोपाठ आरोपीही सापडू लागले.
आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे.
दावेझरी गावात आजाराची साथ पसरलेली असतानाही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. जलजन्य आजाराने नागरिक त्रस्त आहेत. परिणामी दोघांचे जीव गेल्यामुळे गावात जादूटोणा केल्याचा संशय बळावू लागला. अख्ख्या गावालाच जादुटोण्याने झपाटले आहे. खूनानंतर मृतदेह तुमसर रूग्णालयात आणण्यात आले होते. तोपर्यत ढोक दाम्पत्यांची दोन्ही मुले तुमसर पोहोचली. परंतु ते इतके दहशतीत होते की दावेझरीला जावू शकले नाही. मृतदेह कुजलेले असल्यामुळे शवविच्छेदनासाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे.
नागरी हक्क अधिकाऱ्यांची भेट
दुसऱ्या दिवशीही गावात शांतता कायम आहे. घटनास्थळाला नागरी सुविधा हक्क अनुसूचित जाती संरक्षण अधीक्षक निर्मलादेवी व कुंदा तिडके यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. मंगळवारला आरोपीना न्यायालयात हजर केले जाणार आहे. घटेनचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड करीत आहे. (लोकमत चमू)

अंनिसने नोंदिविला निषेध
साकोली : गावात जादुटोणा केल्याने महिला व एका बालकाचा मृत्यू झाला असा संशय घेवून ढोक कुटूंबातील दावेझरी टोला गावात भर चौकात मारुन हत्या करण्यात आली. व मृतदेह जंगलात फेकण्यात आले. याचा घटनेचा अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. या प्रकरणात जे लोक सहभागी त्यांच्यावर कठोर कारवाईची, मागणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली आहे. जादुटोणा विरोधी कायदयाची कायदेशीर अंमलबजावणी करुन पोलीस ठाण्यामार्फत गावागावात प्रबोधन कार्यक्रम करण्याची गरज असल्याचे जिल्हा संघटक वंसत लाखे, जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा उपाध्यक्ष डी. जी. रंगारी, ग्यानचंद जांभूळकर, मुलचंद कुकडे, प्रिया शहारे, यशवंत उपरीकर, प्रोफेसर बहोकर, के. एस. रंगारी यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Excluded before it, then taken creatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.