नवरात्रोत्सवात खरेदीचा उत्साह
By Admin | Updated: October 16, 2015 01:15 IST2015-10-16T01:15:46+5:302015-10-16T01:15:46+5:30
पितृपंधरवड्यात १५ दिवस थंडावलेल्या बाजारपेठेत नवरात्रोत्सवात पुन्हा एकदा उत्साह संचारला असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आहे.

नवरात्रोत्सवात खरेदीचा उत्साह
भंडारा : पितृपंधरवड्यात १५ दिवस थंडावलेल्या बाजारपेठेत नवरात्रोत्सवात पुन्हा एकदा उत्साह संचारला असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आहे. गर्दीत खरेदी करण्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र महागाईमुळे आवश्यक साहित्याचे दर महागले आहेत.
नवरात्रोत्सवात सर्वच बाजारपेठांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी बाजारात गर्दी झाली होती.
पूजेच्या साहित्याला मागणी
नवरात्रोत्सवात पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. परडी, घट, ओटी, बांगड्या, धान्य, कापूर, नारळ, अगरबत्ती, नाडाबंद, पत्रावळी, सूर्यफूल आणि इतर साहित्यांची महिला खरेदी करीत आहेत. या वस्तूंची किंमत २० ते ८० रुपयांदरम्यान आहे. नवरात्रोत्सवात घरात घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसह सार्वजनिक मंडळांचा सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता.
गणेशोत्सवात लाखोंची विक्री
यंदाच्या गणेशात्सवात लाखोंची विक्री झाल्याची माहिती आॅटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली. देशातील मोठ्या कंपन्यांसाठी गणेशोत्सवापासूनचे तीन महिने भरभराटीचे असतात. विक्री वाढविण्यासाठी विविध कंपन्या या दिवसात विविध योजना आणतात. त्याचा फायदा ग्राहकांनाही होते.
(प्रतिनिधी)