शिक्षण समिती सभापतीची जि.प.शाळांची पाहणी
By Admin | Updated: July 3, 2014 23:25 IST2014-07-03T23:25:24+5:302014-07-03T23:25:24+5:30
शाळेचा पहिला दिवस, शाळेत असलेली अव्यवस्था तथा यात असणारी शिक्षकांची जागृकता व जबाबदारी तपासण्यासाठी जिल्हा परिषदचे शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी चुल्हाड

शिक्षण समिती सभापतीची जि.प.शाळांची पाहणी
चुल्हाड (सिहोरा): शाळेचा पहिला दिवस, शाळेत असलेली अव्यवस्था तथा यात असणारी शिक्षकांची जागृकता व जबाबदारी तपासण्यासाठी जिल्हा परिषदचे शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांना भेट देऊन आढावा घेतला.
सिहोरा परिसरातील बहुतांश गावे नद्यांच्या काठावर आहेत. या गावात पुराचे पाणी शिरत असल्याने पावसाळ्यात पुरग्रस्तांची तात्पुरती सोय जिल्हा परिषद शाळा समाजमंदिर आदी इमारतीत केली जाते. याशिवाय जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा व पावसाळापूर्वी उपाययोजना हे तपासण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी शाळांना अकस्मात भेट दिली. जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली तथा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. चुल्हाड, सिंदपुरी येथील शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तथा शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत असल्याने शिक्षकांचे कौतुक केले. याशिवाय देवसर्रा येथील शाळेत अव्यवस्था दिसून आलेल्या आहेत. या शाळेत १ ते ७ तुकड्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी या शाळेत विद्यार्थ्यांची अनुपस्थिती दिसून आली आहे. याशिवाय सामान्य ज्ञान सांगणारे फलकात सुधारणा करण्यात आली नाही. या फलकावर प्रधानमंत्री, खासदार यांचे नाव जुनेच दिसून आले. अन्य सामान्य ज्ञानात हाच फरक दिसून आल्याने सभापती रमेश पारधी यांनी शिक्षकांची चांगलीच क्लास घेतली. शालेय वातावरणात शिक्षकांची जबाबदारी विषयी बोधामृत पाजले. या शिवाय जिल्हा परिषद शाळेत असलेल्या स्वयंपाक गृह आणि पिण्याचे पाणी या विषयावर पारधी हे गंभीर असल्याचे दिसून आले. बहुतांश शाळेत त्यांनी याच मुद्दाची बारकाईने तपासणी केली. मध्यान्ह भोजनाचे खाद्यान्न, साहित्य याशिवाय विद्यार्थ्यांची बैठकीची व्यवस्था, पिण्याची पाण्याची स्वच्छता यांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय सुविधांचे दस्तऐवज तपासले. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांकरवी होणारे हयगय खपवून घेतली जाणार नाही. शाळेत समस्या असल्यास निकाली काढण्यासाठी शिक्षण समिती, पालक-शिक्षण समिती यांच्या संयुक्त बैठकीने सोडविण्याचे निर्देश दिले. शाळेत नवीन बांधकाम, संदर्भात थेट संपर्क साधण्याची सुचना पारधी यांनी दिले. यावेळी उपशिक्षणाधिकारी आर.आर. गाढवे उपस्थित होते.
सिहोरा परिसरात तीन जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. यात बहुतांश गावे नदी काठावर आहेत. पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरताच अनेक आजारांचा प्रसार होत आहे. होणाऱ्या आजारापासून सावधता बाळगण्यासाठी अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, सरपंच, आरोग्यसेविका यांची संयुक्त आढावा बैठक घेणार आहेस. ही बैठक पावसाळापूर्वी सिहोऱ्यात आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी चर्चेदरम्यान लोकमतला दिलीे (वार्ताहर)