माजी सैनिकाने दिले तरुणाईच्या पंखांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:34 IST2021-02-13T04:34:55+5:302021-02-13T04:34:55+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वरठी : देशसेवेत जाण्याची इच्छुक तरुणांची संख्या कमी नाही. परंतु, मार्गदर्शनाअभावी भंडारा जिल्ह्यातील तरुणाई माघारत ...

The ex-soldier gave strength to the wings of youth | माजी सैनिकाने दिले तरुणाईच्या पंखांना बळ

माजी सैनिकाने दिले तरुणाईच्या पंखांना बळ

लाेकमत न्यूज नेटवर्क

वरठी : देशसेवेत जाण्याची इच्छुक तरुणांची संख्या कमी नाही. परंतु, मार्गदर्शनाअभावी भंडारा जिल्ह्यातील तरुणाई माघारत आहे. हेच हेरून माजी सैनिक दिलीप बावनकुळे यांनी भरतीपूर्व माेफत प्रशिक्षण सुरू केले. आपल्या लक्ष्यामागे धावणाऱ्या तरुणाईला मूलमंत्र दिला. जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यांतील दीडशे मुलेमुली १० महिन्यांपासून माेहाडी तालुक्यातील वरठी येथे प्रशिक्षण घेत आहेत.

माजी सैनिक दिलीप बावनकुळे वयाच्या १७ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. सेवाकाळ संपल्यानंतर त्यांनी देशसेवेचे व्रत साेडले नाही. पुण्यात एमपीएससीची तयारी करू लागले. दरम्यान, काेराेनाने जनजीवन विस्कळीत झाले. ते गावी परतले. मात्र, गावात आले ते ध्येय ठरवून. दरम्यान, त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणाची तयारी करताना काही मुले-मुली दिसले. परंतु, याेग्य मार्गदर्शन नसल्याचे जाणवले. अशातच काही तरुणांनी त्यांना विनंती केली आणि त्यातून प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ राेवली. सध्या दीडशे मुलेमुली येथे माेफत भरतीपूर्व प्रशिक्षण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यांतून शेकडाे तरुण-तरुणी येण्यास उत्सुक आहे. बावनकुळे यांच्या साेबतीला माजी सैनिक विजय पटले, शरद हटवार, वर्गमित्र सचिन फुलबांधे, चेतन डांगरे, शैलेश भारतकर, स्वाती फुलबांधे, दीपिका पटले, स्विटी डांगरे आहे.

यशाला अडचणीची जाेड असते. प्रशिक्षणाला सुरुवात झाली, पण जागेची समस्या पुढे आली. पण, यावर मात करीत माेरगाव शिवारात असलेला कालवा निवडला. जागा स्वच्छ करून प्रशिक्षणाला सुरुवात झाली. पावसाळ्यात पुन्हा समस्या निर्माण झाली. खुल्या जागेत प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले. प्रशिक्षणार्थ्यांची संख्या वाढली. जागेचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. आमदार राजू कारेमाेरे यांच्या खुल्या पटांगणाचा वापर सुरू झाला. येथे सकाळ, संध्याकाळ सराव सुरू आहे. शानुकुमार तांबेकर यांच्या मदतीने लेखी परीक्षा सुरू आहे. स्पर्धा परीक्षेचे वर्ग नेहरू वाॅर्डातील संत गाडगेबाबा मंदिरात घेतले जातात. सध्या तरुणाई जाेमाने कामाला लागली.

Web Title: The ex-soldier gave strength to the wings of youth