विकासात परिवर्तनाची नांदी

By Admin | Updated: June 12, 2017 00:28 IST2017-06-12T00:28:26+5:302017-06-12T00:28:26+5:30

बावनथडी, गोसेखुर्द यासह लहान मोठ्या प्रकल्पांना नवसंजीवनी देवून कामे धडाक्यात सुरु आहेत.

The evolutionary alteration in development | विकासात परिवर्तनाची नांदी

विकासात परिवर्तनाची नांदी

नाना पटोले : सबका साथ सबका विकास संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बावनथडी, गोसेखुर्द यासह लहान मोठ्या प्रकल्पांना नवसंजीवनी देवून कामे धडाक्यात सुरु आहेत. विरोधकांनी तीस वर्षांचा कालावधी व सन २०१४पासून तीन वर्षांचा कालावधी तपासावा. त्यांना त्यांचे प्रश्नांचे उत्तर आपोआप मिळेल. येणाऱ्या काळात विविध विभागातून विकासाच्या बाबतीत परिवर्तनाची नांदी दिसून येईल असे आशावादी प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
रविवारी सकाळी ११ वाजता एमईसीएल व पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भंडारा येथील श्री गणेश हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सबका साथ सबका विकास संमेलनात खासदार पटोले मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशिवार, माजी खासदार शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष मो. तारिक कुरेशी, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदिप पडोळे, पवनीच्या नगराध्यक्षा पुनम काटेखाये, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, एमईसीएलचे पदाधिकारी डी. पी. द्विवेदी, निरंजन मिश्रा आदी उपस्थित होते.
केंद्रशासनातील भाजपची तीन वर्षातील कामगिरी यासह विविध योजनांची माहिती देण्यासाठी सदर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाची सुरुवात दिप प्रज्वलन व श्रीगणेश वंदनेने करण्यात आली. तत्पूर्वी सामुहिक राष्ट्रगान करण्यात आले.
नाना पटोले म्हणाले, बावनथडी हा महाराष्ट्रातील एकमेव असा प्रकल्प आहे, ज्याला एकमुस्त एक हजार ६०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. गोसेखुर्द धरणाच्या बाबतीतही शेतकऱ्यांना मोबदला न देता पाणी अडविण्यात आले होते. पुनर्वसन केल्याशिवाय धरणाचे पाणी अडवू नये ही भुमिका मागेही घेतली होती. सत्तेत आल्यानंतर जवळपास आठ हजार कोटींची कामे गोसेखुर्द मध्ये खेचून आणली आहेत. २०१९ पर्यंत धरणाचे काम पूर्णत्वास येवून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून देण्याचे ध्येय आहे.
धारगाव टप्पा १ सिंचन अंतर्गत रावणवाडी जलाशयात पाणी सोडण्यात येण्याची कल्पना साकारण्यात येणार आहे. तसेच धारगाव टप्पा २ अंतर्गत गडेगाव, लाखनी, एकोडी, किन्हीपर्यंतचा भाग ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आहे. करचखेडा उपसा सिंचन योजना यावर्षीपासून सुरु होणार असून धापेवाडा टप्पा २ अंतर्गत त्या योजनेचे पाणी चोरखमारा व बोदलकसा येथे सोडण्यात येणार आहे. यामुळे शेकडो हेक्टर शेतजमिन ओलिताखाली येईल. घरकुलाचा मुद्दा रेटून खासदार पटोले म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवासयोजनेअंतर्गत प्रत्येकाला निवारा देण्याचे स्वप्न पाहिले आहे. स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. जनता दरबारातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर असून एपीएल धारकांसाठी १ लक्ष ६१ हजार क्विंटल धानाचा अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न बघितले असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही खासदार पटोले यांनी आवाहन केले.
याप्रसंगी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार काशिवार, नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनीही केंद्र तथा राज्य शासनाच्या विविध योजनांबाबद माहिती देवून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. समारोपप्रसंगी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शोबीज या इव्हेंटच्या रुपाली बिरे यांनी केले तर आभार एनईसीएलचे निरंजन मिश्रा यांनी मानले. या संमेलनाला भाजपचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

पांडे महालाबाबत होणार बैठकीत चर्चा
जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पांडे महालाच्या विक्रीबाबत येत्या दोन ते तीन दिवसात बैठक घेण्यात येवून चर्चा करण्यात येईल, अशी रोखठोक भूमिका खा. पटोले यांनी घेतली. संमेलन आटोपल्यावर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या पांडे महाल विक्रीच्या संदर्भात काही क्षणासाठी तणाव निर्माण झाला होता. पांडे महाल ही एक ऐतिहासिक वास्तु असतानाही ती वास्तु हेरिटेजमध्ये का समाविष्ट करण्यात आली नाही. खा. पटोले यांनी, वेळप्रसंगी राज्यशासनाने यावर हस्तक्षेप करुन सदर वास्तू हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हा पातळीवर सभा घेवून समोपचाराने व सकारात्मक दृष्टीकोनातून विषय सोडविण्यावर भर देण्यात येईल, असेही सांगितले. पत्रपरिषदेला आमदार रामचंद्र अवसरे, शिशुपाल पटले, सुनिल मेंढे, प्रदिप पडोळे, तारिक कुरैशी आदी उपस्थित होते.

Web Title: The evolutionary alteration in development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.