सामाजिक समतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे
By Admin | Updated: June 28, 2015 00:53 IST2015-06-28T00:53:01+5:302015-06-28T00:53:01+5:30
समाजाच्या सर्व स्तरात सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समता प्रस्थापित करण्यासाठी, सवार्ना समान संधी व हक्क ....

सामाजिक समतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे
सामाजिक न्याय दिन : राजेंद्र निंबाळकर यांचे प्रतिपादन
भंडारा : समाजाच्या सर्व स्तरात सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समता प्रस्थापित करण्यासाठी, सवार्ना समान संधी व हक्क मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तरच छत्रपती शाहु महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले.
सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वीज वितरणचे अधीक्षक अभियंता एस.एस. मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए.आर. रामटेके उपस्थित होते. शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सहकार, क्रीडा या सर्वच क्षेत्रात भरीव काम केले. पुरोगामी महाराष्ट्राची जडण- घडण होण्यात त्यांचे विचार आणि कार्याचा मोठा वाटा आहे. त्यांचे विचार कृतीत आणणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले. यावेळी मेश्राम म्हणाले, एक राजा असूनही शाहू महाराजांना जातीभेदाचा सामना करावा लागला होता. सामान्य माणसाला याचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांच्या संस्थानात त्यांनी जातीभेदाला थारा दिला नाही. सर्वांना समान संधी आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य झिजविले. अशा या कल्याणकारी राजाचे विचार आजही अंगिकारणे गरजेचे आहे.
यावेळी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या आणि दहावी व बारावी परीक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये १७६ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला. यातील काही जोडप्यांचा ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. राजेदहेगाव येथील निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि माविमच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंभोरकर यांनी अनुसूचित जातीच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचविल्या. त्यानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)