अखेर कापडी तंबूतील चौकीत सुविधा पोहोचल्या
By Admin | Updated: April 27, 2015 00:18 IST2015-04-27T00:18:29+5:302015-04-27T00:18:29+5:30
प्रखर उन्हाळ्यात पोलीस कर्मचारी कापडी तंबूत सुविधांच्या अभावातही कर्तव्य बजावीत आहेत.

अखेर कापडी तंबूतील चौकीत सुविधा पोहोचल्या
पलंग, पाण्यासाठी मडके दिले : पोलीस अधीक्षकांचे निर्देश
प्रशांत देसाई भंडारा
प्रखर उन्हाळ्यात पोलीस कर्मचारी कापडी तंबूत सुविधांच्या अभावातही कर्तव्य बजावीत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने आज ‘साहेब जगू देत नाही... कर्तव्य झोपू देत नाही!’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित केले. याची दखल खुद्द पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी घेत ठाणेदार हेमंत चांदेवार यांना सर्व कापडी तंबूत सुविधा पुरविण्याचे फर्मान सोडले.
राष्ट्रीय महामार्गावर वसलेले व शहरातून राज्य मार्ग गेल्याने येथून मोठ्या प्रमाणात वैध व अवैध वाहतूक होते. या वाहतुकीवर नियंत्रण ठेवता यावे व नागरिकांना सुरक्षा प्रदान करता यावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य चौक असलेल्या राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, खाम तलाव चौक, शितला माता मंदिर, बडा बाजार चौक, चांदणी चौक, त्रिमूर्ती चौक येथे कापडी तंबू लावून येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
कर्तव्य चोखपणे बजावण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळप्रसंगी आराम व बैठकीसाठी दिलेला पलंग आठवडापूर्वी एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून काढून घेतला होता. कापडी तंबूत कर्तव्य बजावीतांना त्यांना विभागाने कुठल्याही सुविधा पुरविल्या नाही. मात्र, संघटना नसल्याने हे पोलीस कर्मचारी गुमान कर्तव्य बजावित आहेत. त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत लोकमतने आज ‘साहेब जगू देत नाही... कर्तव्य झोपू देत नाही!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. झोपेत असलेल्या पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे यांनी भंडाराचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांना कापडी तंबूत सर्व सोयीसुविधा देण्याचे निर्देश दिले आहे. कापडी तंबूत कर्तव्यावरील पोलिसांना बसण्यासाठी पलंग, खूर्ची व थंड पाणी पिण्यासाठी मातीचे माठ दिले. येत्या दोन दिवसात सर्व तंबूत कुलर लावण्याचे निर्देशही पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांनी मानले आभार
पोलीस कर्मचाऱ्यांची कैफियत ‘लोकमत’ने ठळक मथळ्यात प्रकाशित केले. पोलिसांची पहिल्यांदाच बेधडकपणे लोकमतने बाजू मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकमतचे आभार मानले. काहींनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन तर काहींनी फोनवर आभार व अभिनंदन केले.