अखेर व्यवस्थापकासह ग्रेडरवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 9, 2015 00:42 IST2015-12-09T00:42:10+5:302015-12-09T00:42:10+5:30
तुमसर येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने सिहोरा परिसरातील हरदोली गावात धान खरेदी केंद्रावर गेल्या वर्षातील अतिरिक्त धान्य साठा ...

अखेर व्यवस्थापकासह ग्रेडरवर गुन्हा दाखल
खरेदी विक्री संस्थेतील प्रकरण : साठवणूक करणे आले अंगलट
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने सिहोरा परिसरातील हरदोली गावात धान खरेदी केंद्रावर गेल्या वर्षातील अतिरिक्त धान्य साठा नायब तहसिलदारांच्या धाडीत सापडून आल्याने या प्रकरणात सिहोरा पोलीस ठाण्यात आज मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास व्यवस्थापक व ग्रेडरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एस.आर. गौतम (व्यवस्थापक) व डी.एम. रहांगडाले (ग्रेडर) अशी गुन्हा दाखल केलेल्याची नोंद आहेत. या घटनेमुळे परिसरातील साठेबाजी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
तुमसर येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेमार्फत तुमसर बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सन २०१४ मध्ये सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर व्यवस्थापक व ग्रेडर यांचे संगनमताने शेतकऱ्यांच्या धान खरेदीत आलबेल करण्यात येत होते. क्विंटलमागे अतिरिक्त पोत्याच्या वजनमापीच्या नावावर एक ते दोन किलो धान्य शेतकऱ्यावरून वसुल करण्यात येत होते, असे एकूण ३३६ कट्टे धानाचे साठवणूक करून गोडावूनमध्ये नियमबाह्यरित्या ठेवण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या हक्काच्या धानातून अवैधरित्या साठेबाजी करून पैसे कमविण्याचा प्रयत्न व्यवस्थापक आणि ग्रेडर नी सुरू केल्याची तक्रार तुमसरच्या तहसिलदारांना करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्या पथकाने हरदोली येथील अनाधिकृतरित्या धान्याच्या साठेबाजी आलेल्या गोडावूनवर धाड टाकली होती. या धाडीत अवैधरित्या धान्याच्या साठेबाजी करण्यात आलेले धानाचे कट्टे पथकाने व्यवस्थापक व गे्रडर यांना सुपूर्दनाम्यावर दिले नसताना जप्तीच्या धान्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न व्यवस्थापक व ग्रेडर ने केला असल्याचे नायब तहसिलदारांच्या निदर्शनास आले आहे. शासकीय जप्तीच्या धान्याची अफरातफर केल्याप्रकरणी नायब तहसिलदार सिहोरा सर्कल निलेश प्रकाश शेंडे यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात व्यवस्थापक एस.आर. गौतम व ग्रेडर डी.एम. रहांगडाले यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी भादवी कलम ४०९, १८८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.