अखेर प्रवेश शुल्काचा तिढा सुटला
By Admin | Updated: July 29, 2016 00:41 IST2016-07-29T00:41:07+5:302016-07-29T00:41:07+5:30
येथील जिल्हा परिषद महाविद्यालयातील शाळा समितीने इयत्ता ११ व्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कात वाढ केली होती.

अखेर प्रवेश शुल्काचा तिढा सुटला
प्रकरण आंधळगाव येथील : शिवसेनेच्या आंदोलनानंतर समितीची बैठक
आंधळगाव : येथील जिल्हा परिषद महाविद्यालयातील शाळा समितीने इयत्ता ११ व्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कात वाढ केली होती. या वाढीविरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाला न जुमानता महाविद्यालयीन शिक्षण समिती व पालकांनी सभा घेऊन प्रवेश शुल्क कमी न करण्याचा निर्णय घेतला.
आंधळगाव येथे जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय आहे. १० व्या वर्गातून उत्तीर्ण झालेल्या गावातील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना विनाअनुदानित व अनुदानित तुकडीमध्ये ११ व्या वर्गात प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज सादर केले. बाहेरगावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी महाविद्यालयाने तासीकाधारक तज्ज्ञ शिक्षकाकडून शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालयीन शिक्षण समिती व पालक समितीची सभा जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत विद्यार्थ्यांना एक हजार रूपये शुल्क तर बाहेरगावच्या शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार ५०० रूपये शुल्क आकारणीचा निर्णय घेण्यात आला. या ठरावाला शाळा कमिटी व पालक सभेच्या सदस्यांनी सहमती दर्शविली.
दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीने शुल्क वाढ केल्याने विद्यार्थी व पालकांवर होत असलेलया आर्थिक भुर्दंड कमी करावा यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने शुल्क वाढ कमी केल्याची माहिती शिवसेने दिली. मात्र सदर शुल्क कमी केली नसल्याची माहिती शाळा शिक्षण समितीने दिले आहे. शिवसेनेचे आंदोलन तुर्तास थांबावे, यासाठी नायब तहसीलदार हरीभाऊ थोटे, उपशिक्षणाधिकारी पडोळे, गटशिक्षणाधिकारी गाढवे, मुख्याध्यापक बी.टी. बोळणे यांनी शिवसैनिकांशी चर्चा करून फी कमी करण्याचे आश्वासन दिले.
मात्र जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे, पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांनी प्रवेश फी जिल्हा परिषदेने दिलेल्या आदेशानुसार ठरविण्यात आल्याचे पालकांना वस्तुस्थिती सांगितली. यानुसार प्रवेश शुल्काची फी जैसे थे ठेवण्यात आली. (वार्ताहर)