वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतरही प्रवाशांची शिवशाहीलाच पहिली पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:53+5:302021-03-31T04:35:53+5:30
संतोष जाधवर भंडारा : एसटी महामंडळातर्फे खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक आगारात वातानुकूलित ...

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतरही प्रवाशांची शिवशाहीलाच पहिली पसंती
संतोष जाधवर
भंडारा : एसटी महामंडळातर्फे खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक आगारात वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने एसटी प्रवाशांची संख्या कमी होत असली तरी दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात मात्र शिवशाहीलाच प्रवाशांची पहिली मिळत आहे. अनेकजण नागपूरला जाताना शिवशाहीनेच प्रवास करतात. भंडारा नागपूर मार्गावर शिवशाहीच्या दिवसभरात १५ बसेस अनेक फेऱ्या मारतात. भंडारा जिल्ह्यात शिवशाहीच्या गाड्या भंडारा बागारात १०, साकोली आगारात १, तर गोंदिया आगारात ०४, तर उर्वरित ०५ बसेस तुमसर आगाराला मिळाल्या आहेत. या सर्व बसेस नागपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, तुमसर, अमरावती, भंडारा नागपूर अशा धावत होत्या. मात्र यातील तुमसर आगारातून धावणारी तुमसर अमरावती ही शिवशाही सध्या बंद करण्यात आली आहे. मात्र तरीही शिवशाहीच्या गाड्या भंडारा नागपूर मार्गावर धावत आहेत. त्यामुळे एसटी प्रवाशांची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी आजही शिवशाही बसेस मात्र सध्या चांगल्या चालत असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अधिकाऱ्यांनी दिली.
बॉक्स
भंडारा नागपूर मार्गावर चांगला प्रतिसाद
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळाने बसेस बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र त्यानंतर एसटी महामंडळाने भंडारा नागपूर मार्गावर शिवशाहीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. या शिवशाहीला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून आजही भंडारा नागपूर मार्गावर अनेक शासकीय अधिकारी,कर्मचारी, सामान्य नागरिक शिवशाहीनेच प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बसेस वातानुकूलित असल्याने तसेच अवघ्या तासाभरात नागपुरात पोहोचत असल्याने प्रवासी शिवशाहीला पसंती देत आहेत. भंडारावरून निघालेली शिवशाही बस कुठेही थांबा घेत नसल्याने आपसूकच प्रवाशांची पावले शिवशाहीकडे ओढली जात आहेत.
बॉक्स
नांदेड सोलापूर मार्गावर शिवशाहीची एकही बस नाही
भंडारा विभागीय एसटी कार्यालयाने अनेक मार्गावर शिवशाही बसेस सुरू करून प्रवासी संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक अधिकारी कर्मचारी भंडारा जिल्ह्यात नोकरीनिमित्त असल्याने त्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी मात्र नांदेड सोलापूर मार्गावर डायरेक्ट एकही शिवशाहीची बस नसल्याची ओरड आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, सोलापूर येथील अनेक प्रवासी असतानाही शिवशाहीअभावी हे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत आहेत. भंडारा ते सोलापूर शिवशाही सुरू केल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ शकते. ही बस फेरी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
बॉक्स
चंद्रपूर मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद नाही
शिवशाहीच्या अनेक बसेस या भंडारा नागपुर, नागपूर गोंदिया, भंडारा तुमसर अशा फेर्या होत आहेत. मात्र पवनी मार्गे जाणाऱ्या चंद्रपूरला शिवशाहीचा प्रवाशांचा प्रतिसादच नसल्याने या मार्गावर मात्र एकही शिवशाही धावत नाही. यासोबत नागपूर चंद्रपूर मार्गावर शिवशाही धावत असल्याने भंडारा चंद्रपूर मार्गावर मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या मार्गावर शिवशाही नसल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
शिवशाहीचे नागपूर तिकीट १२५ रुपये
एसटी महामंडळाने खासगी कंपनीशी करार करुन सुरू केलेल्या शिवशाही बसचे नागपुरचे तिकीट १२५ रुपये आहे. मात्र लालपरीपेक्षा तिकीट दर ज्यादा असला तरीही कमीत कमी वेळात, वातानुकूलित आणि आरामदायी वाटत असल्याने आजही प्रवासी शिवशाहीनेच ये-जा करत आहे.
जिल्ह्यातील शिवशाही बसेसची संख्या २०
सध्या सुरू असलेल्या शिवशाही बसेसची संख्या २०