ऐंशीनंतरही ज्येष्ठांचा आत्मविश्वास दांडगा; ३०८ वृद्धांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:25+5:302021-06-09T04:43:25+5:30
भंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले, मात्र जगण्याची इच्छाशक्ती व आत्मविश्वास दांडगा करीत जिल्ह्यातील ३०८ वृद्धांनी कोरोनावर ...

ऐंशीनंतरही ज्येष्ठांचा आत्मविश्वास दांडगा; ३०८ वृद्धांची कोरोनावर मात
भंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले, मात्र जगण्याची इच्छाशक्ती व आत्मविश्वास दांडगा करीत जिल्ह्यातील ३०८ वृद्धांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. इतरांनाही याबाबत ते प्रेरणा देत आहेत.
भंडारा जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यात ८० वर्षांवरील वृद्धांनाही कोरोनाची लागण झाली. पहिल्या लाटेत ११७ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या लाटेत २०२ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. यावेळी २१ वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८० वर्षांवरील एकूण ३२ वृद्धांचा मृत्यू झाल्या. परंतु अन्य ३०८ वयोवृद्धांनी जगण्याची उमेद सोडली नाही. प्रचंड इच्छाशक्ती व दांडगा आत्मविश्वास जोपासत त्यांनी कोरोनाला हरविले. ६० ते ७० या वयोगटातील ३०६ वयोवृद्ध दुसरा लाटेत मृत्युमुखी पडले तसेच ७१ ते ७९ या वयोगटातील १२२ ज्येष्ठ कोरोनामुळे मृत पावले आहेत.
४० ते ६० या वयोगटात सर्वाधिक मृत्यू
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत घातक ठरली. ४० ते ६० या वयोगटातील नागरिक सर्वाधिक मृत्युमुखी पडले. ४० ते ५० या वयोगटातील १७५ व्यक्ती दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत पावले तसेच ५१ ते ६० या वयोगटातील ३०४ व्यक्ती कोरोनाच्या लढाईत हरले. पहिला लाटेत ४१ ते ५० या वयोगटातील ४८, तर ५१ ते ६० या वयोगटातील एकूण ८९ नागरिक कोरोनामुळे मृत पावले होते.
बॉक्स
आम्हाला कुणीच हरवू शकत नाही
मनुष्याने एकदा मनात आत्मविश्वास निर्माण केला व जिंकण्याची जिद्द सोडली नाही तर तो शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. कोरोनाच्या बाबतीतही हेच झाले. मी हिंमत हारली नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. आप्तस्वकीय यांच्याशी बोलत होतो, नातवंडांची हालचाल विचारत होतो. अशात मन गमत गेले. कोरोनावर आपण हमखासपणे मात करू शकतो.
- नारायण खेडीकर, एकोडी, ता. साकोली
बॉक्स
दोन महिन्यांपूर्वी मला कोरोना झाला होता. मात्र मी हिंमत सोडली नाही. आरोग्य विभागामार्फत मिळालेली औषधे नियमित वेळेत सेवन केली. कोरोना ब्लॉकमध्ये असतानाही काही अस्वस्थ वाटायचे. मात्र मनाने कधीही खचून गेलो नाही. १४ दिवसांनंतर सुटी झाल्यावर एक वेगळा अनुभव मी प्राप्त केला. माणसाने कधीही जगण्याची उमेद सोडू नये.
बाबूराव वासनिक, ज्येष्ठ नागरिक, भंडारा