हिंदू-मुस्लीम बांधवांनी जपली एकात्मता
By Admin | Updated: April 19, 2016 00:33 IST2016-04-19T00:33:00+5:302016-04-19T00:33:00+5:30
कोणताही धर्म असो तो सदैव समाजाला चांगली वागणूक, प्रेम, शांती, सद्भाव व एकात्मतेची शिकवण देतो.

हिंदू-मुस्लीम बांधवांनी जपली एकात्मता
बाबा सय्यद अहमद साबरी दर्ग्यावर ऊर्स : शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
भंडारा : कोणताही धर्म असो तो सदैव समाजाला चांगली वागणूक, प्रेम, शांती, सद्भाव व एकात्मतेची शिकवण देतो. एका दुसऱ्या प्रती धर्माप्रती आस्था, विश्वास ठेवून त्यांच्या प्रती आदर व सन्मानाची भावना व वागणूक जपली पाहिजे. एक असाच विश्वास व आस्था ठेवणारे शहरातील प्रतिष्ठीत स्व.गंगाराम नागपुरे कुटुंबातील रमेश नागपुरे व मित्र परिवार मागील ३४ वर्षांपासून राजगोपालाचारी वॉर्ड स्थित बाबा सैय्यद अहमद साबरी यांच्या दर्ग्यावर दरवर्षी ऊर्सचे आयोजन करीत आहेत.
आयोजित कार्यक्रमात हजारो हिंदू मस्लिमांनी चादर अर्पण केली.
नागपुरे परिवारातील वरिष्ठ सदस्य रमेश नागपुरे यांनी सांगितले, राजीव गांधी चौक येथे दीडशे वर्षाअगोदरपासून बाबांची मजार होती. गंगाराम नागपुरे यांनी बीडी उद्योग (कारखाना) सुरु केला. बाबांच्या कचऱ्याच्या विळख्यात असलेल्या मजारविषयी त्यांच्या मनात आस्था व विश्वास वाढला. वडीलांबरोबर सर्वात मोठे बंधू खुशाल नागपुरे यांनी परिसर स्वच्छ करून कंपाउंड वॉल बांधून देखभाल व पूजा सुरु केली.
१९७९ च्या काळात दुम्मा हाफीज शेख हे रोज चादर व फातीहा करीत असत. त्यांना २१ रु. महिना देत होते. आई वडीलांच्या पुण्याईने नागपुरे कुटुंबियांना बाबांची सेवा आणि पूजा करण्याचा वसा मिळाला.
मागील ३४ वर्षांपासून सतत ऊर्स व महाप्रसाद (लंगर)चे आयोजन अत्यंत शांत व उल्हासीत वातावरणात नागपुरे परिवारातर्फे होत आहे. हिंदू मुस्लिम एकोपा, सद्भावना जोपासण्याचे काम या दर्ग्यामुळे होत आहेत. या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधव तन, मन लावून हिरीरीने भाग घेतात. रमेश नागपुरे यांचे लहान भाऊ निर्मल नागपुरे दरबाराची देखभाल करतात. मुस्ताक भाई (मौलाना) हे ३३ वर्षांपासून येथे फातीहा देतात. बशीरभाई घोडेवाले ३४ वर्षांपासून आपले घोडे सजवून आणतात. काटेखाये डेकोरेशन कडून ३० वर्षांपासून डेकोरेशनची व्यवस्था करतात. यावर्षी ही चार हजारांवर हिंदू मुस्लिम भाविकांनी येथील कार्यक्रमात सहभागी होवून दर्ग्यावर चादर चढविली.
कार्यक्रमासाठी निर्मल नागपुरे, नरेंद्र, सुनिल, कुणाल, कुशांक, चंद्रशेखर, चैताली, पंकज, प्रफुल्ल, सर्व नागपुरे परिवार, मुस्ताक मौलाना, कुरैशी मास्तर, अब्बू भैय्या, गुड्डू मिस्त्री, बब्बूभाई, मतीनभाई (कुक), काटेखाये, श्रीराम तुरस्कर (धान्यवाले), बाबा ट्रॅव्हल्स, पटेल व नागरिकांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)