रमजानमुळे बाजारात संचारला उत्साह
By Admin | Updated: June 30, 2016 00:47 IST2016-06-30T00:47:45+5:302016-06-30T00:47:45+5:30
सध्या रमजान महिना सुरू असल्याने शहरातील बाजारपेठेत तेजी आली आहे. दुकानांना नवी लकाकी प्राप्त झाली आहे.

रमजानमुळे बाजारात संचारला उत्साह
आर्थिक मंदीनंतरही गर्दी : शारीरिक आणि मानसिक आत्मशुध्दीसाठी रोजा
भंडारा : सध्या रमजान महिना सुरू असल्याने शहरातील बाजारपेठेत तेजी आली आहे. दुकानांना नवी लकाकी प्राप्त झाली आहे. येथील मुस्लीम लायब्ररी चौक तर रमजाननिमित्त विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे. रमजान मासात लागणाऱ्या वस्तू आणि पदार्थांनी दुकाने नटली आहेत. खरेदीसाठी ग्राहकांच्याही उड्या पडत असून विविध दुकानांमध्ये झुंबड होत आहे.
शारीरिक आणि मानसिक आत्मशुद्धीसाठी रोजा (उपवास) अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे रोजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून रोजा ठेवला जातो. रमजान मास सुरू असल्याने भंडाराच्या बाजारपेठेत विविध वस्तूंच्या विक्रीमध्ये तेजी आली आहे. दुकानांमध्ये लोकांची गर्दी होत आहे. खरेदी वाढल्याने साहजिकच बाजारालाही नवी लकाकी प्राप्त झाली आहे. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या वर्षीपेक्षा यंदा काहिसे मंदीचेच वातावरण आहे. विविध वस्तूंची महागाई वाढल्यामुळे ग्राहकांकडून तेवढीसी मागणी नाही. परंतु, येत्या जुलै महिन्यात रमजान ईद येत आहे. तेव्हा बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे. रमजान ईदनिमित्त वाढू शकणारी मागणी लक्षात घेता, व्यापाऱ्यांनी आतापासूनच ज्यादा मालाचा साठा करून ठेवला आहे.
रमजान महिन्यानिमित्त खजूर, शेवया, काजू, खुरमा, किसमिस, फेनी, पिस्ता, अक्रोड, अंजीर, जरदाळे, केसर आदींना विशेष महत्त्व असते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या पदार्थांचा साठा वाढविला आहे. परंतु दुष्काळी स्थिती बघता सध्याच मागणी वाढलेली नाही. बेकरी दुकानदार म्हणाले की, ग्राहकांकडून फार कमी मागणी आहे. शेवयांचे दर ६० ते १२० रूपये प्रती किलो आहेत. तर कलकत्ता फेनीचे भाव १३० रूपये किला किलो आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत २० रूपयांनी वाढ झाली आहे. कापड व्यावसायिक यांचे मतही काहीसे तसेच आहे. ते म्हणाले, यंदा सध्या तरी मागणी फारशी वाढलेली नाही. परंतु रमजानच्या २० व्या दिवसानंतर मागणी वाढली आहे. रमजानच्या काळात शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुस्लीम लायब्ररी चौकातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा असा रमजानचा उत्सव सध्या सुरु आहे. या काळात अल्लाह तालाकडून मोठ्या प्रमाणात भरभराट आणि आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर भाविकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी पारखून पाहणाराही हा काळ आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास, कुराण पठण, नमाज, रात्रीभर सुरु असणारा उत्सव, जकात, इफ्तार पार्टी आणि विशेष म्हणजे दानधर्माचा महिना अशा अत्यंत महत्त्वाच्या कर्तव्यांची पूर्तता करण्यात मग्न असतात. रमजाननंतर ईद साजरी केली जाते. तिलाच ईद-उल-फितर असेही संबोधले जाते.
ड्रायफ्रुटची मागणी घटली
मुस्लीम लायब्ररी चौकातील ड्रायफ्रुट व्यापारी यांनी सांगितले की, या वर्षी बाजारात मंदी आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस ज्यादा खरेदी करू शकत नाही. त्यामुळेच आमच्या दुकानात आम्ही गेल्या वर्षीपेक्षा यंदा ड्रायफ्रुटची मागणी कमी केली आहे.
काजूचे भाव झाले दुप्पट
काजूचे भावही गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट वाढले आहेत. मागील वर्षी काजूचा भाव ४०० ते ६०० रूपये किलो असा होता. तेच भाव वाढून यंदा ६०० ते ११०० रूपयांपर्यंत वधारले आहेत.
नारळाचे भाव उतरले
गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारपेठेत यंदा कोरड्या नारळाचे भाव घटले आहेत. गेल्या वर्षी नारळाचे भाव २०० रूपये प्रती किलो होते. मात्र, यावर्षी १२० रूपये इतका कमी भाव आहे. म्हणजेच जवळपास ८० रूपयांनी नारळाचे दर घटले.