ऊर्जामंत्र्यांचा वीज अभियंत्यांना महिनाभराचा अल्टिमेटम
By Admin | Updated: August 21, 2015 00:19 IST2015-08-21T00:19:55+5:302015-08-21T00:19:55+5:30
राज्यातील ११ कोटी ७० लाख लोकांचा वीज विभागाशी थेट संबंध आहे. ग्राहक सेवेचे व्रत स्वीकारले असताना तुम्ही लोकांच्या समस्यांचे समाधान करीत नाहीत.

ऊर्जामंत्र्यांचा वीज अभियंत्यांना महिनाभराचा अल्टिमेटम
विजेची अनियमितता भोवणार : मंत्री असावा तर असा जनतेचा सूर
भंडारा : राज्यातील ११ कोटी ७० लाख लोकांचा वीज विभागाशी थेट संबंध आहे. ग्राहक सेवेचे व्रत स्वीकारले असताना तुम्ही लोकांच्या समस्यांचे समाधान करीत नाहीत. वीजेची समस्या उद्भवू नये यासाठी ऊर्जा विभागाने ठोस पावले उचलली असतानाही तुम्हाला जनतेच्या समस्या दिसत नाहीत. मी १६ तास काम करतो. तुम्ही कार्यालयात बसून गोष्टी हाकता. यापुढे असे चालणार नाही, अशी तंबी देत पुढील महिन्यातील भेटीत जिल्ह्यात अशी समस्या आढळून आली तर तुम्हाला घरी बसावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज अभियंत्यांना दिला.
भंडारा जिल्ह्यातील वीज वितरण, पारेषण समस्यांसंबंधी ना.बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारला आढावा बैठक घेतली. ही बैठक तब्बल रात्री १०.३० वाजतापर्यंत चालली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींसह जनतेने शेकडो समस्या मांडल्या. समस्या का सुटल्या नाहीत, त्यावर उत्तरे देण्यासाठी अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. उत्तरे देताना टाळाटाळीचा प्रकार लक्षात येताच ऊर्जामंत्री अधीक्षक व कार्यकारी अभियंत्यांवर जाम भडकले. आजच गोंदियात तिघांना निलंबित केले. याद राखा जनतेच्या समस्या तातडीने सोडविल्या नाहीत तर तुम्हाला घरी बसवावे लागेल, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.
अपघातस्थळ दिसला तर याद राखा
जिल्ह्यात कुठेही वाकलेले खांब दिसता कामा नये, तारांमध्ये झाडांच्या फांद्या गुंतलेल्या दिसू नये, ट्रान्सफार्मरवर वेली चढलेल्या असू नये, ट्रान्सफार्मरच्या खालील परिसर झुडूप व कचऱ्याने वेढलेला दिसू नये, खांब जमिनीपासून जीर्ण झालेला दिसू नये, याची पाहणी करण्यासाठी अधीक्षक अभियंतासह महिनाभरात गल्लीनगल्ली पिंजून काढा, असे आदेश अभियंत्यांना दिले. मी १६ तास काम करतो तुम्ही बसून राहता. महिनाभरानंतर पुन्हा येईन तेव्हा मी स्वत: गावात फिरेन. त्यावेळी अपघातस्थळ दिसले तर याद राखा, असा दमही ना.बावनकुळे यांनी दिला. यावेळी ते मुख्य अभियंता सतीश मेश्राम व कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांच्यावर चांगलेच भडकले. (जिल्हा प्रतिनिधी)
-तर एफआयआर करेन
वीज तारांच्या स्पर्शाने मृत्यू होण्याच्या घटना घडतात. यापुढे अशा घटना घडल्या तर संबंधित अभियंत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी दिली. अधीक्षक अभियंत्याचे कार्यकारी अभियंत्यांशी, कार्यकारी अभियंत्याचे उपविभागीय अभियंत्यांशी, उपविभागीय अभियंत्यांचे कनिष्ठ अभियंत्याशी आणि कनिष्ठ अभियंत्याचे शाखा अभियंते यांच्यात समन्वय नाही. सर्व टाळाटाळीची उत्तरे येत आहेत. वीज विभागात काम करायचे आहे की घरी बसायचे आहे, ते सांगा, असा इशाराही ना.बावनकुळे यांनी दिला.
त्यांचा घरभाडे भत्ता बंद करा
ग्राहकसेवा मजबूत करणे हा वीज विभागाचा उद्देश आहे, असे असताना अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. जे अधिकारी मुख्यालयी न राहताही घरभाडे भत्ता उचलतात. त्यांचा भत्ता तातडीने बंद करण्यात यावा आणि त्यांना ब्रेक देण्यात यावा, असे निर्देश ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांना दिले.
वृत्तपत्रातील बातमी तक्रार समजा
तुम्ही एक तर लोकांच्या तक्रारी स्वीकारत नाहीत. तक्रार स्वीकारली तर लोकांना न्याय देत नाहीत. त्यामुळे जनता वृत्तपत्राच्या माध्यमातून तक्रार नोंदवितात. तुम्ही वृत्तपत्राच्या बातम्यांचीही दखल घेत नाहीत. दररोज तुमच्याबद्दल वाईट लिहून येते. यापुढे वृत्तपत्रातील बातमी ही तक्रार समजून समस्या निकाली काढा, असे निर्देशही ना.बावनकुळे यांनी दिले.