एसटीत राखीव जागांवर अतिक्रमण
By Admin | Updated: June 6, 2016 00:35 IST2016-06-06T00:35:04+5:302016-06-06T00:35:04+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंगांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर धडधाकट प्रवासीच अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते.

एसटीत राखीव जागांवर अतिक्रमण
सेवाभावी योजनांचा फज्जा : लाखांदूर परिसरात प्रवाशांची गैरसोय
लाखांदूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंगांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर धडधाकट प्रवासीच अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते. वाहकाकडून याबाबत कुठलेही सहकार्य मिळत नसल्याने महामंडळाच्या सेवाभावी योजनांचा फज्जा उडाला आहे.
अपंग प्रवाशांना एसटीत चढता-उतरताना चालक-वाहकांनी मदत करणे आवश्यक आहे. तशी प्रत्येक बसच्या दरवाज्यावर सूचनादेखील लिहिलेली असते. प्रत्यक्षात ही सूचना केवळ नावाला असून काही अपवाद चालक-वाहक वगळता कोणीच अपंग व ज्येष्ठ नागरिकांना कोणीच मदत करीत नसल्याचे दिसून येते. अपंगांना तिकीट दरात सवलतीशिवाय कुठल्याच सोयी-सुविधा दिली जात नाही. शिवाय अपंगांच्या राखीव जागांवर धडधाकट व्यक्ती बसल्यावर त्यांना वाहक किंवा चालक उठवीत नाही.
अपंग व्यक्ती बसमध्ये चढताना किंवा उतरताना अनेक प्रवासी त्यांच्याकडे केवळ बघण्याची भूमिका घेतात. परंतु त्यांना मदत करण्यास कुणी पुढे येत नाही, हे वास्तव आहे. अनेकांना मदत करण्यास कमीपणा वाटतो. काही जणाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने यातून सामाजिक बांधिलकी हरविल्याचे दिसते. याशिवाय प्रवाशी निवाऱ्याजवळ जेव्हा प्रवासी एस टी ची प्रतीक्षा करत असतात तेव्हा वाहक बस किती तरी पुढे उभी करुन प्रवाशाना धावून बस मध्ये चढण्यास बाध्य करीत असल्याचे चित्र पंचायत समितीपुढील बस स्थानकावर व शिवाजी टी. पाईंट्वर दररोज दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
सौजन्य मोहिमेचे तीनतेरा
एसटी महामंडळाने प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे ठरवून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यस्तरावरुन ही योजना जाहीर झाली असून एसटी वाहक व चालकांनी प्रवाशांशी सौजन्याने आणि सन्मानपूर्वक वागावे यासाठी यापूर्वी राज्य परिवहन विभागाने चालक व वाहकांना प्रशिक्षणही दिले होते. वाहकांनी बस निघण्यापूर्वी प्रवाशांना नमस्कार करून संपूर्ण माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. परंतु अशा प्रकारचे सौजन्य तर सोडाच अपंग, महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यास वाहक कधी प्रयत्न करताना दिसत नाही.