राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: December 28, 2016 01:59 IST2016-12-28T01:59:07+5:302016-12-28T01:59:07+5:30
अतिक्रमणाने बरबटलेल्या भंडारा शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविले
सकाळपासून कारवाई : जिल्हा प्रशासन, नगरपालिका व पोलिसांची धडक मोहीम
भंडारा : अतिक्रमणाने बरबटलेल्या भंडारा शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांपासून सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासन, नगर पालिका व पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
नगरपालिका निवडणूक आटोपताच जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासन विकास कामांसह नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. आजच्या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे काम सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या बंगल्यापासून ही मोहीम आज मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. तहसील कार्यालय, पंचायत समितीसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते, सदर अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काढण्यात येईल, अशी दवंडी काल सोमवार सुनावण्यात आली होती. यात अतिक्रमण धारकांनी स्व:त अतिक्रमण काढून घ्यावे, असे दवंडीतून कळविण्यात आले होते. यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नववर्षात राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा साजरा केला जाणार असल्यामुळे हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रस्ता मोकळा
राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. वृक्षांचा आडोसा घेऊन लहान दुकानदारांनी अतिक्रमण केले होते. बसस्थानकाहून महामार्गावर येत असताना डावीकङून येणारे वाहन दृष्टीस येत नव्हते. परिणामी अनेकदा लहानमोठे अपघात घडले आहेत. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागाची सुरक्षा भिंतही दिसू लागली आहे. हा रस्ता मोकळा झाला असला तरी खुला मार्ग रहदारीसाठी तयार करणे गरजेचे आहे. अन्यथा परिस्थिती ‘जेसे थे’ तशी होईल, यात शंका नाही.
आज बाबा रिकाम्या हाताने परतले
अतिक्रमण करणे हा दोष समजला जात असला तरो वितभर पोटासाठी व्यवसाय करावा लागतो. चोरी करण्यापेक्षा मेहनतीने पोट भरणे केव्हाही चांगले? असा चंग बांधून अनेकांनी महामाार्गच्या दुतर्फा लहान-मोठी दुकाने थाटली आहेत. यात चहाटपरी, पानटपरी, भजी व्यावसायिक, रसवंती व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. मंगळवार सकाळपासूनच जेसीबीच्या साह्याने व पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढणे सुरू झाल्याने दुकानदारांनी काल सोमवारपासूनच स्वत: अतिक्रमण काढणे सुरू केले होते. आज मंगळवारला दुकानच उजाडल्याने सायंकाळी बाबा खाली हाताने परतल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद हिरावला होता.