गोसे फाट्यावरील शासकीय जागेवर अतिक्रमण
By Admin | Updated: July 5, 2017 00:58 IST2017-07-05T00:58:44+5:302017-07-05T00:58:44+5:30
नवेगाव (पाले) येथील रहिवासी असलेला आणि उमरेड येथे बांधकाम विभागात कारकून असलेल्या व्यक्तीने ...

गोसे फाट्यावरील शासकीय जागेवर अतिक्रमण
शासकीय कर्मचाऱ्याचा प्रताप : कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा कोसरा : नवेगाव (पाले) येथील रहिवासी असलेला आणि उमरेड येथे बांधकाम विभागात कारकून असलेल्या व्यक्तीने शासकीय जागेवर नवेगाव येथे अतिक्रमण करून ती जागा हडपण्याचा प्रकार केला आहे. नवेगाव (पाले) येथे गोसे प्रकल्पाच्या मुख्य मार्गावर हे अवैध बांधकाम सुरु आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेतात येण्याजाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
कुंपणच शेत खाण्यास निघाले असा काहीसा प्रकार नवेगाव (पाले) या छोट्याशा गावात होत आहे. घराशेजारी आणि आजूबाजूच्या शेतात येण्याजाण्याच्या जागेवर आणि भंडारा गोसे मार्गावर नवेगाव (पाले) येथे गोसे फाट्याजवळ असलेल्या रस्त्यालगत होत आहे. त्यामुळे याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
पवन नखाते हे सार्वजनिक बांधकाम विभाग, उमरेड येथे कारकून पदावर कार्यरत आहेत. ते स्वत: आई व कुटुंबासोबत नवेगाव (पाले) येथे गोसे फाटा येथे राहतात. त्यांनी गोसे मार्गावर येण्याजाण्याच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून दुकानाची चाळ बांधकाम सुरु केले आहे. यासाठी रेती, विटा जमा करून सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम करीत आहेत. त्यामुळे तेथून रस्ता असलेल्या लोकांनी त्यांना हटकले. ग्रा.पं. ला तक्रार केली पण त्यांचे देखील ते जुमानत नाही. घराचे बांधकाम करताना शासकीय जागेवरील झाडे तोडली. त्यामुळे त्यांनी शासनाची वनसंपदा नष्ट केली आहे.
बांधकाम केलेल्या जागेतून अनेकांचा शेतात येण्याजाण्याचा मार्ग असल्याने शेतीचे हंगाम कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शासकीय जागेवर गोसे फाट्यावर असलेले अतिक्रमण त्वरीत हटविण्याची मागणी जिल्हाधिकारी, तहसीलदार पवनी तसेच मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनातून राकेश श्रावण नागरीकर, सीताराम वकटू नखाते व शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास उपोषणावर बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.