आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करा
By Admin | Updated: June 5, 2015 00:55 IST2015-06-05T00:55:59+5:302015-06-05T00:55:59+5:30
आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे स्वप्न शासन व प्रशासन बघत आहे.

आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करा
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : आदिवासी विभागाने पुढाकार घेण्याची गरज
भंडारा : आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे स्वप्न शासन व प्रशासन बघत आहे. त्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी तहसिलदार व साजा तलाठी यांनी आदिवासी विद्यार्थी नांमाकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशित होईल या दृष्टीने ८ जूनपासून ग्रामसभा, द्वारभेट व इतर कार्यक्रमाद्वारे योजनेचे महत्व आदिवासी पालकांना समजावून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेशित होतील याबाबत प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत.
सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाकरीता शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळामध्ये शिक्षण देण्याकरीता इयत्ता पहिली व पाचवी मध्ये प्रवेश देण्यास आदिवासी विकास विभागाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
राज्याकरीता २५ हजार विद्यार्थ्यांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यानुसार प्रती प्रकल्प १ हजार याप्रमाणे नागपूर विभागात एकूण ८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून त्याद्वारे नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांस भोजन व निवासासह इंग्रजी माधमातून दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या शाळेतील प्रवेशाकरीता फक्त आदिवासी विद्यार्थी पात्र असून पालकाचे वार्षिक उत्पन्न १ लाख इतके असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्पोटित, निराधार, परित्यक्ता आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंब अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करुन प्रवेशित करण्यात येणार आहे.
प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी प्रवेशाची मोहिम सुरु करणार आहे. आदिवासी विभागाचे अधिकाऱ्यांना तहसिलदारांनी सहकार्य करावे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेचा लाभ देता येईल याबाबत प्रयत्न करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत. (नगर प्रतिनिधी)