मत्स्य व्यवसायामुळे ग्रामीणांना मिळणार रोजगार
By Admin | Updated: May 23, 2017 00:25 IST2017-05-23T00:25:05+5:302017-05-23T00:25:05+5:30
मासोळी हे मानवीय आहारापैकी प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असून जगभरातील लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोक त्यांचे आहारात सेवन करतात.

मत्स्य व्यवसायामुळे ग्रामीणांना मिळणार रोजगार
साकोली येथे आयोजन : आज तलाव तेथे मासोळी अभियानाचा विभागीय शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मासोळी हे मानवीय आहारापैकी प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असून जगभरातील लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोक त्यांचे आहारात सेवन करतात. मत्स्य व्यवसायाचे माध्यमातून अन्न साखळीत उत्तम दर्जाचे प्रथिने मिळवून कुपोषण मुलांची मुक्तता होऊ शकते. तसेच मत्स्य व्यवसायामुळे ग्रामीण भागातील लोकांना पूरक रोजगार आणि उपजिविकेचे अतिरिक्त साधन निर्माण होते.
देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी वर्ष २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आव्हान समोर ठेवले आहे. त्याकरीता गोड्या पाण्यातील मत्स्यविकास झाल्यास ग्रामीण भागातील पोषण सुरक्षा, रोजगार निर्मिती, व्यवसायात महिलांचा सहभाग, अतिरिक्त पूरक अशी बहूविध उद्दिष्टये साध्य करता येईल, या उद्देशाने विभागीयस्तरावर "तलाव तेथे मासोळी" या अभियानाचा शुभारंभ विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते साकोली येथील नवजीवन हायस्कुल, वैनगंगा शैक्षणिक संस्था परिसर नागझिरा रोड येथे २३ मे २०१७ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार नाना पटोले, आमदार राजेश काशिवार, चरण वाघमारे, अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले आदी उपस्थित राहणार आहेत.
भंडारा तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावात गाळ काढणे, तलावाची खोलीकरण करणे या योजनेमुळे जलसाठा असलेले तळयांचा वापर मत्सव्यवसायाला चालना देणे, सुधारित जातीच्या मासोळीचे संवर्धन, ग्रामीण भागात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे, शहरी व ग्रामीण भागात मासोळीच्या स्वरुपात प्रथिनेयुक्त आहाराची उपलब्धता वाढविणे हे प्रमुख ध्येय नजरे समोर ठेवून मत्सयव्यवसाया सहकारी संस्था, खाजगी मत्स्यसंवर्धक, शेततळी धारक, सामान्य शेतकरी, स्वयंसहाय्यता गट इत्यादीच्या उत्पादनात वाढ व्हावी तसेच स्थानिक मासेमारांना रोजगार तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध व्हावा, या दृष्टीकोनातून "तलाव तेथे मासोळी" या अभियानाचा शुभारंभ होत आहे.
अभियानाची उद्दिष्ट्ये- गोडया पाण्यात आढळणाऱ्या स्थानिक उच्चजातीच्या व आहारात उपयुक्त अशा मासोळीचे उत्पादन वाढविणे. तलावात संचयनाकीरता लागणारे मत्सबीज, विशेषत: मत्स्यजिरे व बोटुकलीच्या उत्पादनमध्ये वाढ करणे. सामाजिक व आर्थिकदृष्टया कमकुवत व्यक्ती, स्वयंसहाय्यता गट, महिला बचत गट, पारंपारिक मत्स्यव्यावसायिक इत्यादींना मत्स्यव्यवसायासाठी प्रेरित करुन त्यांचे उत्पन्नात वाढ करणे. मत्स्यव्यवसायासाठी उपयुकत असूनही ज्या तलाव व तळयांचा वापर करुन अधिकाधिक मत्स्योत्पादन प्राप्त करणे. विभागातील शेतकऱ्यांच्या भातशेतीसह शेततळयांमध्ये पुरकव्यवसाय, जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसायास प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ करणे. उत्पादित मत्स्यसाठयाचे विपणन आणि विक्रीबाबतची व्यवस्था सुदृढ व मजबूत करणे. आदिवासी क्षेत्र तथा दुर्गम क्षेत्रात पोषणाचे दृष्टीने आहारामध्ये मासोळीच्या वापरास प्रोत्साहन देणे. शास्त्रोक्त पध्दतीने मत्स्यव्यवसायासाठी तांत्रिक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देणे असा आहे. सदर अभियान मंडळस्तरावर कालबद्ध पध्दतीने राबविण्यात येणार आहे. याकरीता मंडळनिहाय व तालुकानिहाय माहिती संकलित करुन अभियानचे जिल्हास्तरावरील उद्दिष्ट निर्धारित करण्याचे व त्यानुसार आवश्यक नियोजन करण्याचे काम मे अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. प्रत्येक महसूल मंडळात निवडलेल्या बोडी व तळयामध्ये जून ते जुलै या कलावधीत भारतीय प्रमुख कार्प मत्स्यजिऱ्यांचे जिंवत स्वरुपात संचयन करण्यात येणार आहे.
त्यापासून तयार बोटुकलींचा पुरवठा माहे आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत महसूल मंडळातील किमान १० तलाव धारकांना करावयाचा आहे. शेततळी धारक यांना नजिकच स्त्रोतामधून चांगल्या दजार्ची बोटुकली मिळण्याची शाश्वती राहील. तर दुसरीकडे या कालावधीत मत्सयबीज संवर्धन करणाऱ्यास बोटुकली पुरवठयापासून अतिरिक्त उत्पन्न मिळेल. तलाव तेथे मासोळी या अभियानाच्या शुभारंभास मत्सयव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी, खाजगी मत्स्यसंवर्धक, शेततळी धारक, सामान्य शेतकरी, स्वयंसहाय्यता गटाचे पदाधिकारी, पुरुष व महिला बचत गटाचे पदाधिकारी तसेच जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.