रोजगार सेवकाने केला अपहार
By Admin | Updated: September 1, 2015 00:35 IST2015-09-01T00:35:39+5:302015-09-01T00:35:39+5:30
तालुक्यातील गटग्रामपंचायत वलमाझरी येथील रोजगार सेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस मजूर दाखवून अपहार केल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला.

रोजगार सेवकाने केला अपहार
ग्रामसभेत घेतला ठराव : वलमाझरी येथील प्रकार
साकोली : तालुक्यातील गटग्रामपंचायत वलमाझरी येथील रोजगार सेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस मजूर दाखवून अपहार केल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकाला पदावरून कमी करण्यात यावे असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या ग्रामरोजगार सेवकाने किती रुपयाचा अपहार केला याची चौकशी झाली नसून तशी तक्रारही सरपंच व सचिव यांनी पंचायत समिती व पोलीस ठाण्यात दिली नाही. त्यामुळे या रोजगार सेवकासोबत अपहार करण्यात कोण कोण होते याचा उलगडा होऊ शकला नाही.
शासन नियमानुसार १५ आॅगस्ट रोजी वलमाझरी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र यावेळी ग्रामरोजगार सेवक यांच्यावर लावण्यात आलेले आरोप व त्यावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे ही ग्रामसभा थांबवून पुन्हा दि. १२ आॅगस्ट रोजी पिटेझरी येथे पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली.
यात ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मार्च २०१५ ला झालेल्याकामाचे हजेरी पत्रक वाचन करताना दि. ९ मार्च ते १५ मार्च या दरम्यान काही मजुरांची नावे कामावर हजर नसताना सुद्धा हजेरी पत्रकावर हजेरी दाखवून प्रत्यक्ष गैरव्यवहार केल्याचे आढळून आले.
गोरख मेश्राम, लिलाधर गहाणे, सुधीर टेकाम यांनी गैरव्यवहार असल्याचे मान्य केले. तसेच मेघा नागदेवे, वैशाली कोवे, स्वाती टेकाम ही व्यक्ती त्यांच्या पतीच्या गैरहजर असल्याचे मान्य केले. आणखी काही नावे व इतर हजेरी पत्रकातील नावे सादर करण्याची पुरुषोत्तम रुखमोडे यांनी ग्रामसभेत सांगितले. त्यामुळे ग्रामरोजगार सेवक झिंगर कापगते यांना रोजगार सेवक पदावरून कमी करण्याचे ग्रामसभेने सर्वानुमत ठरविण्यात आल्याचे ठराव घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)