कर्मचाऱ्यांची निदर्शने
By Admin | Updated: December 28, 2016 02:05 IST2016-12-28T02:05:32+5:302016-12-28T02:05:32+5:30
राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात संप पुकारला आहे.

कर्मचाऱ्यांची निदर्शने
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेकडो कर्मचारी झाले सहभागी
भंडारा : राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात संप पुकारला आहे. या अनुषंगाने आज दुपारी २ वाजताच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दिली.
महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समन्वय कृती समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या निदर्शनात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. समन्वय समितीचे निमंत्रक वसंत लाखे यांच्या नेतृत्वात आज निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जानेवारी महिन्यात तीन दिवसाचा राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असून त्यात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होत असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक १८ ते २० जानेवारीला प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जात आहेत. ९ डिसेंबरला मुंबई येथे झालेल्या राज्य समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला असून त्यांच्या मागण्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करावा, नवीन अंशदायी पेंशन योजना रद्द करावी, महिलांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा द्यावी, निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे व आठवडा पाच दिवसांचा करावा, आरोग्य परिचारांना किमान वेतन १० हजार रुपये द्यावे, २८ आॅगस्ट २०१५ चा संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा आणि अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन होईपर्यंत वेतन सुरु ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांना घेऊन राज्यातील कर्मचाऱ्यांनी शासनाकडे दोन वर्षात लक्षवेध दिन, निषेध दिन, दोन तास जादा काम आंदोलन, आझाद मैदानावर मोर्चा, लाक्षणीक संप आदी करण्यात आले. मात्र शासनाने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून समस्या प्रलंबित ठेवल्या आहेत. यामुळे जानेवारी महिन्यात तीन दिवसांचा या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ वाजता (भोजनाची सुटी) यावेळेत निदर्शने करण्यात आली. यावेळी लढा प्रचार प्रमुख रामभाऊ येवले, जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे, मुख्य संघटक अतुल वर्मा, कार्याध्यक्ष सतीश मारबते, रविंद्र तायडे, एम.बी. भोयर, जाधवराव साठवणे आदींसह शेकडो कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)