‘आशां’ चा सन्मानासाठी ‘एल्गार’
By Admin | Updated: December 25, 2016 00:48 IST2016-12-25T00:48:36+5:302016-12-25T00:48:36+5:30
आशा सेव्विकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांचा लवकरात लवकर तोडगा काढून आशांना न्याय द्यावा,

‘आशां’ चा सन्मानासाठी ‘एल्गार’
चर्चासत्र : महिला राजसत्तेचा पुढाकार
भंडारा : आशा सेव्विकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांचा लवकरात लवकर तोडगा काढून आशांना न्याय द्यावा, अन्यथा सन्मानासाठी महिला राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्याचा निर्धार करण्यात आला.
गणेशपूर ग्रामपंचायतच्या सभागृहात आशा सेविकांचे चर्चासत्र पार पडले. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या चर्चासत्रात आशांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, यासोबतच त्यांना योग्य मानधन देण्यात यावे, कामाचे निश्चित तास करण्यात यावे, आशांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, निवडणुकीत सहभागी होऊन निवडून आलेल्या आशांचे पद कायम ठेवावे, कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांच्या अधिकाऱ्यांच्या दबावामुळे राजीनामे मागून घेतले, अशा आशांना दोन्ही पदे रिक्त न करता कायम ठेवण्यात यावे. यासह अन्य मागण्यांची पूर्तता न झाल्यास महिला राजसत्ता आंदोलन समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा या चर्चासत्रातून देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष शालू तिरपुडे, माधुरी देशकर, शारदा गायधने, वनिता भुरे, तारा कुंभलकर, शुभांगी श्रृंगारपवार, शामकला कांबळे, संगीता मडामे यांच्यासह शेकडो आशा सेविका उपस्थित होत्या.
या चर्चासत्रात भंडारा, पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर व मोहाडी या तालुक्यातील आशा सेविका उपस्थित होत्या. प्रास्ताविक शालू तिरपुडे यांनी केले. संचालन रिता सुखदेवे यांनी केले तर आभार माधुरी देशकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)