जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी

By Admin | Updated: August 21, 2015 00:15 IST2015-08-21T00:15:10+5:302015-08-21T00:15:10+5:30

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिर व कुपनलिका आहेत, पण त्यांच्याकडे कृषिपंपासाठी वीज जोडणी नाही, अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना जून २०१६ पर्यंत वीजजोडणी द्यावी.

Electricity connections to all farmers by June | जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी

जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी

चंद्रशेखर बावनकुळे : प्रत्येक उपविभागात होणार रोहित्र दुरुस्ती युनिट
भंडारा : ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिर व कुपनलिका आहेत, पण त्यांच्याकडे कृषिपंपासाठी वीज जोडणी नाही, अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना जून २०१६ पर्यंत वीजजोडणी द्यावी. वीज जोडणीचे अर्ज ग्रामपंचायत, तलाठी, वायरमन, कृषि सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या घरी जावून अर्ज भरुन घ्या, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महावितरण व महापारेषणशी संबंधित जिल्ह्यातील अडचणी व तक्रारी जाणून घेण्यासाठी व जिल्ह्याचा ऊर्जा कृती आराखडा तयार करण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार नाना पटोले, आ.रामचंद्र अवसरे, आ.बाळा काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, महापारेषणचे संचालक (प्रकल्प) ओमप्रकाश येम्पाल, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, महापारेषणचे मुख्य अभियंता मिलींद बहादूरे उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात एकही शेतकऱ्यांचा कृषिपंपासाठीचा अर्ज प्रलंबित राहू नये, याची खबरदारी घ्यावी. तलाठी, कृषी सहाय्यक, लाईनमन व अभियंता यांची समिती स्थापन करुन त्यांच्यामार्फत कृषी पंपाच्या वीज जोडणीचे सर्वेक्षण करुन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करा. जिल्हाधिकारी कृषी ऊर्जा करणावर नियंत्रण ठेवतील. डिमांड भरलेल्या १,७३५ शेतकऱ्यांना डिसेंबरपर्यंत जोडणी द्यावी. अर्ज केला पण डिमांड दिले नाही आणि त्याकाळात शेतकऱ्याने आत्महत्या केली तर संबंधित अभियंत्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. वीज वितरणासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून इन्फ्रा-२ या योजनेमध्ये जिल्ह्याला ४४ कोटी रुपये देण्यात आले आहे. मागील पाच महिन्यांपासून ही काम सुरु करण्यात आली असून एप्रिल २०१६ पर्यंत पूर्ण होईल. बेरोजगार अभियंते आणि आय.टी. आय. युवकांसाठी बेरोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. यामधून बेरोजगारांना कामे उपलब्ध करुन देणार आहे.
राज्यात दोन हजार मेगावॅट वीज शिल्लक असूनही पारेषण व वितरण व्यवस्था मजबूत नसल्यामुळे ग्राहकांना भारनियमानाचा फटका बसत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात १,५०० कोटीची योजना आखली आहे. त्यातून भंडारा जिल्ह्याला १५० कोटी देण्यात येणार येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)
आता गाव व शेतीसाठी वेगळे फिडर
शेती आणि गावातील विजेचा भार वेगवेगळा करण्यासाठी गावठाण फिडर लावण्यात येणार आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेमध्ये ३२ कोटी रुपयांची तरतूद केली असून शेती आणि गावासाठी वेगवेगळे फिडर उभारण्यात येतील. त्याचबरोबर कोणतेही गाव सिंगल फेजींगमध्ये ठेऊ नये, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
रोहित्र दुरुस्तीसाठी स्वतंत्र युनिट
रोहित्र खराब झाले किंवा जळाले तर त्या भागातील वीज पुरवठा खंडीत राहतो. रोहित्राची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी प्रत्येक उपविभागाला रोहित्र दुरुस्ती युनिट सुरु करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. रोहित्राअभावी वीज पुरवठा खंडीत राहू नये म्हणून १०० नवीन रोहित्र उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.
भंडारा, तुमसर, पवनीत भूमिगत योजना
वादळ व पावसामुळे खांब व वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडतात. उघडया वीज तारांमुळे शहरांचे सौंदर्य विद्रुप होते. त्यामुळे सर्व शहरांमध्ये भूमिगत वीज वितरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व पवनी या शहरांसाठी भूमिगत वीज वितरण योजनेमधून २० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील.
भंडारा व गोंदियासाठी मुख्य अभियंता
आतापर्यंत नागपूरला मुख्य अभियंत्यांचे पद होते. काम सुटसुटीत व्हावे यासाठी भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यासाठी गोंदिया येथे मुख्य अभियंता कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. महिनाभरात मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Web Title: Electricity connections to all farmers by June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.