भयमुक्त वातावरणात होणार निवडणुका
By Admin | Updated: June 19, 2015 00:57 IST2015-06-19T00:57:17+5:302015-06-19T00:57:17+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून भयमुक्त वातावरण....

भयमुक्त वातावरणात होणार निवडणुका
मुख्य निवडणूक आयुक्त : आढावा जि.प., पं.स. निवडणुकीचा
भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून भयमुक्त वातावरण आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. या प्रक्रियेत कुणी अडथळा आणल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी गुरुवारला दिली.
भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याचे सांगून ते म्हणाले, या निवडणुकीत पहिल्यांदा नामांकनासाठी आॅनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे. याचा अर्थ एक बटन मारली आणि नामांकन दाखल झाला असा नाही. आयोगाने नामांकनाचे प्रारूप संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. इच्छुकांना नामांकन भरुन त्याचे प्रिंटआउट काढून निवडणूक अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत सादर करता येऊ शकते.
गोंदिया जिल्ह्यात ८० टक्के उमेदवारांनी नामांकन भरण्यासाठी आॅनलाईन प्रणालीचा उपयोग केल्याचे सांगून ते म्हणाले, या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात ३० जून आणि भंडारा जिल्ह्यात ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. ही निवडणूक एक हजार मतदान केंद्रावर होत असून निवडणुकीसाठी ४,५०० कर्मचारी आणि १,५०० पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहे. याशिवाय चार निवडणूक निरिक्षक नियुक्त केले असून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील. निवडणूक निरिक्षकांना तीनदा प्रशिक्षण दिले जाणार आहे. पाऊस आला तर त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आले असल्याचे सांगितले.
पत्रपरिषदेला विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक दिलीप झलके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, गोंदियाचे पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
भंडारा जिल्ह्यात २३ नामांकन दाखल
दि.१६ जूनपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आज गुरुवारला तिसऱ्या दिवशीपर्यंत ५२ जिल्हा परिषद गट आणि १०४ पंचायत समिती गणासाठी २३ नामांकन दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषदेसाठी १० आणि पंचायत समितीसाठी १३ नामांकन दाखल झाले आहेत. पवनी तालुक्यात ब्रम्ही जिल्हा परिषद गटासाठी एक, मोहाडी पंचायत समिती गणासाठी एक साकोली तालुक्यात किन्ही (एकोडी) गटासाठी तीन आणि किन्ही गणासाठी एक नामांकन दाखल झाले आहे.
-तर ई-व्होटिंग प्रणाली
निवडणूक आयोगाने आॅनलाईन मतदान अर्थात ई-वोटिंग प्रणाली लागू करण्यासंदर्भात विचार केलेला नाही. मतदारांची इच्छा असेल आणि राजकीय पक्षांनी ठरविले तर आॅनलाइन अर्थात ई-व्होटींग प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी माहिती सहारीया यांनी दिली.