शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक नियमबाह्य
By Admin | Updated: November 26, 2014 23:02 IST2014-11-26T23:02:15+5:302014-11-26T23:02:15+5:30
मुंढरी खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची व्यवस्थापन समितीची निवडणूक दि.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी घेण्यात आली. परंतु प्रक्रिया राबविताना मुख्याध्यापिकेने नियमबाह्य व ग्रामपंचायत

शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक नियमबाह्य
करडी/पालोरा : मुंढरी खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची व्यवस्थापन समितीची निवडणूक दि.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी घेण्यात आली. परंतु प्रक्रिया राबविताना मुख्याध्यापिकेने नियमबाह्य व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पालकवर्गाचे म्हणणे ऐकून न घेता मनमर्जीने समितीची निवड केली. मुख्याध्यापिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सरपंच गौरीशंकर नेरकर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना तक्रारीतून केली आहे.
मुंढरी खुर्द जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पदमाकर रामटेके यांनी शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक घेण्याचे नोटीस पालक वर्गाला पाठविली. मात्र पालक सभा व निवडणूक होण्यासंबंधी गावातील प्रतिष्ठीत मंडळी व जुन्या समितीच्या लोकांना कळविले नाही, बोलविले सुद्धा नाही. पालक सभेत वेळेवर प्रक्रियेचे रोस्टर जाहिर केले. त्यानंतर लगेच बंद खोलीत निवडणूक पार पाडली. काही पालक वर्गांनी विरोध दर्शविला. तरी त्यांना न जुमानता निवड सुरू ठेवली. मुख्याध्यापिकेने माजी शाळा समिती अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच अन्य सन्मानित मंडळ यांना विश्वासात न घेता मनमर्जीने समितीची स्थापना केल्याचा आरोप आहे. नियमबाह्य कुणाचे न ऐकता मनमर्जीने वागणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सरपंच गौरीशंकर नेरकर यांनी आहे. (वार्ताहर)