चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने आठ मुलांना विषबाधा
By Admin | Updated: December 13, 2015 00:25 IST2015-12-13T00:25:04+5:302015-12-13T00:25:04+5:30
खेळताना गावालगतच्या शिवारातील झाडाला लागलेले चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने आठ बालकांना विषबाधा झाल्याची घटना चांदमारा येथील शेतशिवारात शुक्रवारला सायंकाळी घडली.

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने आठ मुलांना विषबाधा
चांदमारा येथील घटना : उपचारार्थ रुग्णालयात दाखल
तुमसर : खेळताना गावालगतच्या शिवारातील झाडाला लागलेले चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने आठ बालकांना विषबाधा झाल्याची घटना चांदमारा येथील शेतशिवारात शुक्रवारला सायंकाळी घडली.
दुर्गा चिंतामण झोळे (८), पायल संजय झोळे (९), यश उमाशंकर झोडे (५), किरण मदन देशमुख (८), रोहित भारतलाल झोळे (१०), मयुरी धनपाल देशमुख (५), प्रीती शोभाराम देशमुख (९), आचल रोशनलाल इनााते (४) असे विषबाधा झालेल्या बालकांची नावे आहेत. गावात घराशेजारी बच्चे कंपनी शेतशिवारात लागल्या वृक्षाचे फळ तोडण्यासाठी गेले. फळे तोडून झाल्यावर सर्वांनी तिथेच खाणे सुरु केले. त्यानंतर मयुरीला भोवळ आल्याने ती खाली पडली. त्यानंतर मुलांनी आरडाओरड करताच नागरिक धावून आले. त्यावेळी तीनचार मुले खाली पडून होते. त्यांना तुम्ही काही खाल्ले असे विचारताच त्यांनी ते फळ दाखविले. ते फळ चंद्रज्योतीच्या बिया असल्याचे निष्पन्न होताच गावकऱ्यांनी वेळ न घालवता गोबरवाही आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी तुमसरला हलविण्याचा सल्ला दिला. या बालकांना सायंकाळी तुमसरात आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)