शिक्षक हा समाजनिर्मितीचा कणा
By Admin | Updated: October 10, 2016 00:30 IST2016-10-10T00:30:24+5:302016-10-10T00:30:24+5:30
जेव्हा शिक्षक जागृत होईल, तेव्हाच विद्यार्थी घडेल. शिक्षकांकडून समाजाला चूक अभिप्रेत नाही.

शिक्षक हा समाजनिर्मितीचा कणा
शंकर राठोड यांचे प्रतिपादन : टेकेपार येथे केंद्रस्तरीय शिक्षक परिषद
भंडारा : जेव्हा शिक्षक जागृत होईल, तेव्हाच विद्यार्थी घडेल. शिक्षकांकडून समाजाला चूक अभिप्रेत नाही. शिक्षक हा समाजनिर्मितीचा कणा आहे. शिक्षकांनी जर मनावर घेतले तर लाखो जिल्हाधिकारी तयार करू शकतात. त्यांनी आपल्या कामावर, पदावर गर्वाने काम केले पाहिजे, असा मौलिक सल्ला भंडारा पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी दिला.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखडा कार्यक्रमांतर्गत धारगाव केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद विनोद विद्यालय टेकेपार (डोड.) येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना शंकर राठोड यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्यामकर्ण तिडके, राजर्षी शिंदे, एच.पी. लांजेवार, सुधीर उके यांची प्रमुख उपस्थिती होती. शंकर राठोड पुढे म्हणाले, शिक्षकांना विद्यार्थी घडविण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्षकांची सतत प्रयत्न करावे. शिक्षकांनी सकारात्म दृष्टीकोन ठेवून पालकांशी सतत संपर्क ठेवले तर गावाचे त्यांना सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले. अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी शिक्षक हा विद्यार्थी कसा घडवू शकतो. लहानशी चूक शिक्षकाला कशी भोवते, हे समजावून सांगितले. श्यामकर्ण तिडके म्हणाले, वर्गातील शेवटच्या बाकावर असलेला विद्यार्थी सुद्धा मागे राहू नये, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक हा भावी पिढी घडविणारा आहे. यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. केंद्रप्रमुख राजर्षी शिंदे यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखड्याची भूमिका समजावून सांगितले व शिक्षकांची याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे सांगितले. यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आराखड्याचे वाचन करण्यात आले. केंद्रातील काही शिक्षकांनी आपण वर्गात कसे शिकवितो, हे प्रत्यक्ष कृतीतून सांगितले.संचालन आचल दमाहे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक लांजेवार यांनी केले. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)