कोका अभयारण्यात साकारणार ‘इको टुरिझम’
By Admin | Updated: October 25, 2016 00:25 IST2016-10-25T00:25:19+5:302016-10-25T00:25:19+5:30
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळ आहेत. त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधीही प्राप्त होत आहे.

कोका अभयारण्यात साकारणार ‘इको टुरिझम’
भंडारा : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळ आहेत. त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधीही प्राप्त होत आहे. भंडारालगत असलेल्या जंगल सानिध्यातील कोका अभयारण्यातही निसर्गाने विविधारंगी उधळण केली आहे. अशा या कोका अभयारण्यात निसर्ग पर्यटन व जैवविविधतेवर भर दिल्यास पर्यटन वाढीला वाव आहे. हा मुद्दा हेरून उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी येथे ‘इको टूरिझम’ करून ग्रामस्थांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक मोठ्या आवडीने पर्यटनासाठी येत असतात. लगतच्या गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा येथील निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक दाखल होतात. अशाच पद्धतीचे भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका अभयारण्यातही निसर्गसौंदर्य आहे. त्याचा विकास केल्यास पर्यटनवाढीला वाव मिळून महसूल वाढेल हे उद्देश उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी हेरले.
याबाबत त्यांनी शनिवारला कोका येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती व ग्रामस्थांची बैठक घेतली. यात तंटामुक्त समिती, सरपंच, उपसरपंच व वनाधिकाऱ्यांचा समावेश होता. यात त्यांनी कोका अभयारण्याला विकसीत करण्यासोबतच येथील ग्रामस्थांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला दिलेल्या जागेवर फळबागेचे रोपवन तयार करून स्वयंरोजगार निर्मितीसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. सध्या येथे पर्यटकांच्या दृष्टीने विश्रामगृह व बांबू कुटी आहे. यासोबतच आणखी निवासाची व्यवस्था करण्यासंदर्भातही यात चर्चा करण्यात आली. वन्यप्राण्यांना बघण्यासाठी ‘वॉच टॉवर’ उभारण्यात येणार आहे. या बैठकीला वर्मा यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक आय.डी. चोपकर, वनपरिक्षेत्राधिकारी डब्लू.आर. खान, वनरक्षक टी.एच. घुले, विपीन डोंगरे यांच्यासह वनकर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
स्वयंरोजगारासाठी प्रयत्न
ग्रामस्थांना गांढूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. महिला व युवतींना स्वयंरोजगार करता यावा यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी येणारा खर्च वनविभाग करणार आहे. वनविभागाच्या ताब्यातून तलावांचे खोलीकरण करून जलसिंचनाची व्यवस्था करण्यात येईल. यासोबतच वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ‘झटका सोलर प्लान’ अनुदानावर वितरीत करण्यात येणार आहे.
अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार
गावातील मुलामुलींना अत्याधुनिक पद्धतीचे स्वयंपाक करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. सोबतच दहावी पास विद्यार्थ्यांना हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचा मनोदय यावेळी वर्मा यांनी व्यक्त केला. कोका अभयारण्याची माहिती पर्यटकांना मिळावी या दृष्टीने दहावी पास मुलांना गाईडस्चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येणार आहे.
सोनकुंड होणार पुनरूज्जीवित
लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून १९७६ ला सोनकुंड जलाशयाचे काम सुरु करण्यात आले होते. कालांतराने १९८० मध्ये वनसंवर्धन कायद्यांतर्गत हे काम रखडले. सोनकुंडचे पुनरूज्जीवन करून तेथील गाळ उपसा करून २० मिटर लांबीचा सिमेंट प्लग बंधारा बांधण्यात येणार आहे. यामुळे कोका येथील जलपातळीत वाढ होईल. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.