भूकंपाचे धक्के नागरिक भयभीत
By Admin | Updated: July 24, 2015 00:28 IST2015-07-24T00:28:25+5:302015-07-24T00:28:25+5:30
लोकमतचा फोन खणखणलाजिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी साकोली, लाखनी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात फोन केले.

भूकंपाचे धक्के नागरिक भयभीत
गावचे गाव घराबाहेर : साकोली, लाखनी, तुमसर तालुक्यात खळबळ
लोकमतचा फोन खणखणला
जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी साकोली, लाखनी, तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात फोन केले. रात्री ८.१५ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत फोन करीत राहिले. सर्वांनी आम्ही घराबाहेर असल्याची आपबिती सांगत होते.
भंडारा : जिल्ह्यातील साकोली, लाखनी आणि तुमसर तालुक्यात गुरुवारच्या रात्री ८.०२ मिनिटांनी भूकंपाचे चार ते पाच सेकंदाचे सौम्य धक्के बसले. सर्वाधिक धक्के साकोली शहरात जाणवले. धक्के जाणवताच भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडले. घरात कुणी जाण्याची हिंमतही करीत नसल्याचे दिसून आले. प्रत्येक जण भीतीपोटी घराबाहेर दिसून आला.
गुरुवारला सकाळपासून पाऊस बरसत आहे. रात्री ८ वाजून दोन मिनिटाच्या सुमारास तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, अड्याळ व भंडारा सीमाक्षेत्रात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर हा धक्का किती प्रमाणात होता, याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विचारले असता माहिती मिळताच कळविण्यात येईल, असे सांगितले. रात्री आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. भुकंपाचे धक्क जाणवताच नागरिकांनी एकमेकांना भ्रमणध्वनीने सूचित करण्यासाठी सरसावले होते.
तुमसर तालुक्यातील सिहोरा, गोबरवाही, लोभी, हसारा, नाकाडोंगरी, चिखला, राजापूर, सीतासावंगी, सिंदपुरी, सुकळी, देवरी, पवनारखारी, सुंदरटोला, आष्टी या गावांमध्ये भुकंपाचे पाच सेकंदापर्यंत धक्के जाणवले. डोंगरी (बुज) येथील रहागडाले यांच्या घरासमोरच्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तुमसर शहरात माकडे वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, जगनाडे वॉर्डातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.
लाखनी तालुक्यातही भुकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक घराबाहेर पडले होते. घरातील साहित्य खाली कोसळले. क्षणात भूकंप आल्याचे कळताच नागरिकांनी घराबाहेर निघाले. साकोली तालुक्यातील एकोडी, किन्ही, सानगडी, सासरा, सिरेगावबांध, वडद, सावरबंधसह अन्य भागातही भुकंपाचा धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. साकोली येथील पंचशील वॉर्डातील फजील खान यांच्या घराच्या भिंतीला बारीक भेग पडली असून मारोतराव साठवणे यांचे घर हलल्यामुळे ते घराबाहेर निघाले.
पवनी तालुक्यातील पवनी, अड्याळ, आसगाव, पालोरा, सिंदपुरी, गोसे क्षेत्रातही भुकंपाचा सौम्य धक्का बसल्याचे नागरिकांनी सांगितले. साकोली येथे नागरिक घराबाहेर एकत्रित झाले होते. विशेष म्हणजे भुकंपाच्या सौम्य धक्क्यात कुठेही हानी झालेली नाही. धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतल्याने अनर्थ टळल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. विशेष म्हणजे त्या-त्या कुटुंबीयांनी आबालवृद्ध व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. लाखांदूर तालुक्यातील मुर्झा गावातही धक्के जाणवल्यामुळे तेथील नागरिक घराबाहेर निघाले होते.
यासंदर्भात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूकंपाचा जिल्ह्याला सौम्य धक्का बसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून त्याची माहिती तातडीने देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)