कमावून खाणारे आणि मागून खाणारे !
By Admin | Updated: May 23, 2015 01:09 IST2015-05-23T01:09:53+5:302015-05-23T01:09:53+5:30
पोटासाठी रक्ताचे पाणी करून कमवून खाणारे आणि दुसरीकडे काहीही काम न करता भिक्षा मागून खाणारे असा विरोधाभास दैनंदिन जीवनात पहावयास मिळत आहे.

कमावून खाणारे आणि मागून खाणारे !
तथागत मेश्राम वरठी
पोटासाठी रक्ताचे पाणी करून कमवून खाणारे आणि दुसरीकडे काहीही काम न करता भिक्षा मागून खाणारे असा विरोधाभास दैनंदिन जीवनात पहावयास मिळत आहे. देवधर्माच्या नावावर ठिकठिकाणी हात पसरून मागणाऱ्यांना दान करुन पुण्य कमावण्याच्या नावावर पैसे मिळतात. याउलट भरउन्हात जीवघेण्या कसरती दाखवून मेहनतीचे पैसे मागणाऱ्यांना हाकलून लावण्यात येते. यामुळे समाजात कमावून खाणाऱ्याऐवजी मागून खाणारे जास्त फायद्यात दिसत आहेत.
खेळ दाखवून मागणारे व काही न करता भीक मागून खाणारे एकाच वर्गात मोडत असले तरी दोघात मोठा फरक आहे. एक माणूस भीक मागून कुटुंब चालवतो तर कुटुंबातील सर्वजण राबराबून उन्हाची पर्वा न करता मेहनतीने कमवतात. एकाही माणसांना उसंत मिळत नाही.
बिऱ्हाड घेऊन जगणारे डोंबारी
प्रत्येक माणूस उदरनिर्वाहासाठी काम करतो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:सह कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतो. गावागावातील चौकाचौकात विविध प्रकारचे खेळ मांडून कला सादर करणारी डोंबारी जमात मोठ्या प्रमाणात दिसते. उन्हाचा पारा कितीही अंशावर गेला तरी कसरती सादरीकरणाच्या कौशल्यात तीळमात्र फरक पडत नाही.
कलेची कदर नाही
जागा असेल त्याठिकाणी एक चादर, दोन बांबू, गळ्यात ढोलके व हातात ताठ घेऊन अर्रर्र.... करीत लोकांचे लक्ष वेधून त्यांच्यासमोर कला सादर करतात. त्यानंतर त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतात. यात एकाच बिऱ्हाडातील नवजात बालकासह वयस्क राबताना आढळतात. खेळ दाखवून पैसे कमाविणारे हे बिऱ्हाड एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरीत होत राहतात.
सोंग घेऊन मागणारे भिक्षेकरी
याउलट खेड्यापासून ते शहरापर्यंत भीक मागणारे नियमित दिसतात. यात लहान मुले, तरुण व वृद्ध यांचा समावेश असतो. काही न करता दुकान दुकान फिरणे व भीक मागणे हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. शरीरयष्टीने सुदृढ असूनही भीक मागणारे मोठ्या प्रमाणात दिसतात. काही तर आंधळे, लंगडे होण्याचे सोंग घेऊन भिक्षा मागतात. यापैकी अनेक जण भीक मागण्याकरिता घाणेरडे कपडे वापरतात व पैसे मागून झाल्यावर चांगल्या कपड्यात फिरताना दिसतात.
लोकहो, जागे व्हा!
शारीरिक कसरती करुन कला सादर करणाऱ्यांना मदत करायची की भिक्षेला रोजगाराचे साधन बनविणाऱ्यांना आळशी करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे मदत कुणाला करायची हे ठरविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भिक्षा म्हणून मदत करताना शारीरिकदृष्ट्या विकलांग व वृद्धांनाच मदत करा, असे केले नाही तर भीक मागणाऱ्यांचे लोंढे वाढणार यात शंका नाही.