तुमसर : तुमसर - मोहाडी तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील क्रीडापटूंनी राज्य तथा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तूंग झेप मारली. पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवा असे आवाहन आ.चरण वाघमारे यांनी केले.नेहरु क्रीडांगणावर आयोजित तालुका क्रीडा संकुलाच्या भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष वंदना वंजारी होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी, पंचायत समिती सभापती कलाम शेख, जि.प. सभापती संदीप ताले, पं.स. उपसभापती वासुदेव वाडीभस्मे, मो.तारीक कुरैशी, उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, मोहाडीचे उपसभापती उपेश बांते, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, नगरसेवक शोभा लांजेवार इत्यादी उपस्थित होते.१२ लाख २७३.६० चौरस मिटरमध्ये हे क्रीडासंकुलाचे बांधकाम होणार असून केंद्र तथा राज्य शासनाचा येथे निधी प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यात २०० मी. ट्रॅक, कबड्डी, खो-खो व्हॉलीबॉलचे क्रीडांगणासह खेळाडूंना राहण्याची सोय येथे करण्यात येणार आहे. आ.वाघमारे यांनी क्रीडासंकुलाकरिता राज्य शासनाकडे पाठपूरावा करण्याची हमी देऊन निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. वेळ पडल्यास आमदार निधीतून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. यावेळी क्रीडा प्रशिक्षक अ.वा. बुद्धे, संजय शर्मा, अर्चना शर्मा, रामदास वडीचार, अशोक बन्सोड यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय, राज्य स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, संचालन क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर तर आभार तहसीलदार सचिन यादव यांनी मानले. यावेळी संतोष वैद्य, खेमराज गभने, चोपकर, विजया जायस्वाल, क्रीडा अधिकारी मिनल थोरात, गजेंद्र कारेमोरे, अनिल जिभकाटे, जवाहर कुंभलकर सह मोठ्या संख्येने गणमान्य नागरीक, खेळाडू उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाव कमवा
By admin | Updated: February 27, 2015 00:33 IST