घरी आईचे पार्थिव तरीही मुलाने बजावले कर्तव्य
By Admin | Updated: January 26, 2017 00:51 IST2017-01-26T00:51:25+5:302017-01-26T00:51:25+5:30
घरी एखादी सुखद किंवा दु:खद घटना घडली तर आपण सर्व कामे बाजुला सारून त्या-त्या कार्यात गुंतून असतो.

घरी आईचे पार्थिव तरीही मुलाने बजावले कर्तव्य
भंडारा : घरी एखादी सुखद किंवा दु:खद घटना घडली तर आपण सर्व कामे बाजुला सारून त्या-त्या कार्यात गुंतून असतो. परंतु वाचकांना सकाळीच वृत्तपत्र मिळाले नाही तर ते अस्वस्थ होतील, या भावनेतून आईचे पार्थिव घरी असतानाही अरविंद शेंडे या वृत्तपत्र विक्रेत्याने घरोघरी जावून दैनंदिन वृत्तपत्र वितरणाच्या कार्यात खंड पडू दिला नाही.
आजच्या काळात वृत्तपत्र वाचन अनेकांचा अविभाज्य अंग बनला आहे. त्यामुळे वेळेत वृत्तपत्र मिळाले नाही तर अस्वस्थ होणारे अनेक आहेत. अनेकांकडे दररोज वृत्तपत्र येत असला तरी घरी वृत्तपत्र कोण टाकतात, याची माहितीही नसते. परंतु वृत्तपत्र वितरक कधी सुटी नसतानाही ही कामगिरी निरंतर बजावत असतो. दररोज पहाटे ४ वाजता उठून बसस्थानकावर जावून आपले वृत्तपत्र त्यांना घ्यावे लागतात. त्यानंतर त्या-त्या भागात जाणाऱ्या मुलांना वितरणासाठी द्यावे लागतात. वाचकांना वेळेत वृत्तपत्र पोहचविण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. मात्र त्यांच्या घरी काही दु:खद घटना घडली तरी अशा घटनांना त्यांना सामोरे जावे लागत असते. वृत्तपत्र वितरक अरविंद शेंडे यांची आई चंद्रभागा रूपचंद शेंडे (७०) यांचे वृद्धापकाळाने रात्री निधन झाले. पार्थिव घरी असल्यामुळे कुटुंबांनी रात्र जागून काढली. अंत्यसंस्कार दुपारला होणार होते. परंतु ग्राहकांना वृत्तपत्र वेळेत मिळाले नाही तर ते अस्वस्थ होतील, या एकमेव तळमळीने ते पहाटे ४.३० वाजताच घरून बसस्थानकावर निघाले. बसस्थानकात वृत्तपत्रांचे गठ्ठे वेगवेगळे करून वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना वृत्तपत्र मोजून देत होते. त्यानंतर एका लाईनवर जावूनही त्यांनी घरोघरी वृत्तपत्र पोहोचविले. घरी आईचे पार्थिव असतानाही अरविंद शेंडे वृत्तपत्र वितरणासाठी येऊन कामात व्यस्त असल्याचे दिसताच अन्य वृत्तपत्र वितरकांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. याची माहिती वाचक आणि ग्राहकांना झाल्यानंतर अरविंद यांच्या कर्तव्यपरायणतेची सर्वत्र प्रशंसा सुरू झाली. यापूर्वी त्यांच्या लहान बंधूचे वृत्तपत्र वितरीत करताना अपघाती निधन झाले होते, त्यावेळीही त्यांनी कर्तव्य बजावले होते, हे विशेष! (जिल्हा प्रतिनिधी)