डम्पिंग रेतीचा गोरखधंदा
By Admin | Updated: July 2, 2014 23:12 IST2014-07-02T23:12:47+5:302014-07-02T23:12:47+5:30
तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) रेती घाटावरुन नियमबाह्यपणे चार महिन्यांपासून रेती चोरीचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. नदीपात्रातून रेतीची उचल करुन गावाबाहेर ती डम्प केली जाते

डम्पिंग रेतीचा गोरखधंदा
तुमसर : तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) रेती घाटावरुन नियमबाह्यपणे चार महिन्यांपासून रेती चोरीचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. नदीपात्रातून रेतीची उचल करुन गावाबाहेर ती डम्प केली जाते व त्यानंतर राजरोसपणे तिची डम्पवरुन उचल करणे सुरू आहे. येथे रेती माफियांचा रॅकेट सक्रिय असून महसूल प्रशासनाने त्यांच्यासमोर नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.
तामसवाडी या गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. विस्तीर्ण नदीघाट येथे आहे. नदीपात्रात मोठा रेतीसाठा उपलब्ध आहे. सुमारे चार ते पाच रेती कंत्राटदाराकडून रेतीची सर्रास उचल केली जात आहे. रेती नदीपात्रातून उपसा करुन सितेपार-डोंगरला रस्त्यावर गावाजवळ डम्प करण्याची शक्कल त्यांनी लढविली आहे. या डम्पवरुन राजरोसपणे ट्रक व ट्रॅक्टरमध्ये ती भरुन तिची वाहतूक सुरू आहे. हे ट्रक नागपूर येथे पाठविण्यात येतात. ट्रॅक्टर तुमसर शहरात रेतीची विक्री करीत आहेत. दररोज १० ते १५ ट्रक व ३५ ते ४० ट्रॅक्टर रेतीची येथून चोरी होत आहे. चार महिन्यांपासून हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. या रेतीचोरीला निश्चितच वजनदार व्यक्तीचे अभय असणार. या सत्रात शासनाने तुमसर तालुक्यातील आष्टी, देवनारा, लोभी व बपेरा या चार रेतीघाटांचेच लिलाव केले आहेत.
तुमसर तालुक्यात नदी व मोठ्या नाल्यांच्या पात्रातून रेतीचा उपसा सुरू आहे. नदीपात्र व जिथे रेती डम्प केली जाते तिथे शासनाचे प्रतिनिधी पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी निश्चितच आहे, त्यांना या डम्पविषयी माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)