पालोऱ्याला तीव्र पाणीटंचाईची झळ
By Admin | Updated: March 14, 2015 00:49 IST2015-03-14T00:49:13+5:302015-03-14T00:49:13+5:30
३ हजार ५०० लोकसंख्येच्या पालोरा गावासाठी १.१० लाख लिटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असतानाही दिड वर्षापासून नागरिकांना तीव्र ...

पालोऱ्याला तीव्र पाणीटंचाईची झळ
युवराज गोमासे करडी
३ हजार ५०० लोकसंख्येच्या पालोरा गावासाठी १.१० लाख लिटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असतानाही दिड वर्षापासून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गुंडभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दारोदारी भटकावे लागत असून अपशब्दांचा मारा सुद्धा सहन करावा लागतो आहे. ग्राम प्रशासन पाणी पुरविण्यास अपयशी ठरले आहे.
मोहाडी तालुक्यातील पालोरा २० वर्षापुर्वी पहाडी जवळील उंच भागात पाणीपुरवठा योजनेची टाकी उभारली गेली. गावाची लोकसंख्या वाढल्याने नेहमी पाण्याची समस्या भेडसायची. त्यावर उपाय म्हणून तत्कालीन ग्राम प्रशासनाने वेळेची गरज ओळखून सन २०१०-११ मध्ये वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वीत केली. आज दोन्ही योजनेची पाण्याची क्षमता १ लाख १० हजार लिटरची झाली आहे तर गावाची लोकसंख्या ३५०० च्या घरात आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात योजनेची क्षमता पुरेशी आहे, असे असतानाही नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याची कारणेही नागरिकांकडून वेगवेगळी सांगितली जात आहेत. योजनेचे पाणी वितरणाचे जाळे उताराच्या दिशेने टाकण्यात आली असल्याने पाणी सरळ शेवटच्या टोकावर पोहचतो. त्यांना २४ तास पाणी मिळते तर उंचावरील नागरिकांना गुंडभर पाणीही मिळत नाही. वितरणाचे जाळे उताराच्या विरूद्ध बाजुने म्हणजे पूर्व-पश्चिम पाहिजे होते, असा तांत्रिक तर्क आहे. नागरिकांनी घरोघरी खोल खड्डे खोदून अतिरिक्त पाणी ओढणे सुरू ठेवले आहे.
काहींनी नळांच्या तोट्या काढलेल्या असून टिल्लू पंपाने पाणी ओढणे सुरू ठेवले. मात्र ग्राम प्रशासनाने सुचना देण्या पलिकडे कार्यवाही केली नाही. त्यामुळे बिना दिक्कत मुठभर नागरिक पोसले जात आहेत.
राजकारणापोटी कारवाई केली जात नाही. जुनी पाईप लाईन खोलवर दाबल्या गेली असून ३ ते ४ फुट मातीचे थर त्यावर तयार झाले आहेत. गावातून मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते तयार झाल्याने आज ती काढून तपासणीही करता येत नाही. जुन्या पाईप लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला जाण्याची शक्यता ग्रामप्रशासनाकडून व्यक्त होत आहे. मुख्य पाईप लाईनवरून गांधी वॉर्डातील मोजक्या नागरिकांसाठी पाईप लाईन टाकली गेल्याने उर्वरित भागाला त्याचा परिणाम भोगावा लागत असल्याचेही नागरिकांचे मत आहे.
पालोरा येथील तीव्र पाणी टंचाईसाठी अनेक कारणे सांगितले जात असली तरी ४० टक्के नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित असून महिलांना गुंडभर पाण्यासाठी दारोदारी भटकावे लागते.
अपशब्दांचा मार सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. गावातील सार्वजनिक स्टॅन्ड पोस्ट निकामी ठरली असून खाजगी कनेक्शन सुद्धा कोरडी आहेत. उन्हाळ्यापुर्वीच तीव्र पाणी टंचाई गावात पहायला मिळत आहे.