निवडणुकीने 'मिनी मंत्रालय' पडले ओस

By Admin | Updated: September 27, 2014 01:17 IST2014-09-27T01:17:03+5:302014-09-27T01:17:03+5:30

सर्व सामान्यांच्या कामाचे हक्काचे ठिकाण म्हणून मिनी मंत्रायल म्हणजेच जिल्हा परिषदेला ओळखले जाते.

Due to the 'mini ministry' elections | निवडणुकीने 'मिनी मंत्रालय' पडले ओस

निवडणुकीने 'मिनी मंत्रालय' पडले ओस

भंडारा : सर्व सामान्यांच्या कामाचे हक्काचे ठिकाण म्हणून मिनी मंत्रायल म्हणजेच जिल्हा परिषदेला ओळखले जाते. विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजल्याने पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविली आहे. तर काहींनी स्वत:च उमेदवारी दाखल केल्याने त्यांना आता विधानसभेत पोहचण्याचे डोहाळे लागले आहे.
जिल्हा परिषदेला ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा संबोधल्या जाते. याला मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. अशा मिनी मंत्रायलयातून राजकारणाची कास धरलेल्या अनेकजणांनी विधानसभेत प्रवेश केला आहे. याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या काही विद्यमान पदाधिकाऱ्यांनीही आपले नशीब अजमाविण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे. निवडणुका होणार असल्याने अनेक दावेदारांनी आपल्या विजयाच्या गणितांची गोळाबेरीज केली आहे. काहींनी जातीच्या तर काहींनी केलेल्या विकासोपयोगी कामाच्या भरोशावर त्यांची उमेदवारी कशी प्रबळ राहिल हे पटवून दिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आता शेवटचे दिवस उरले आहेत. तसतसे पक्षांनी जाहिर केलेले तर काही बंडोबांनीही आपले उमेदवारी अर्ज सादर करून एकमेकांसमोर आवाहन उभे केले आहे.
या निवडणुकीचा ज्वर आता जिल्हा परिषदेतही दिसू लागला आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेचा फेरफटका मारला असता, अर्थ व बांधकाम सभापती वगळता अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य सभापतींचे कक्ष रिकामे दिसून आले. मुळात हे पदाधिकारीच जिल्हा परिषदेकडे आज भटकले नाही. हे पदाधिकारी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकरिता किंवा राजकीय गोळाबेरीज जमविण्यात मशगुल असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्यांचीही हजेरी आता बोटावर मोजण्या इतकी दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्यांना त्यांचे पदाधिकारी किंवा जिल्हा परिषद सदस्य भेटत नसल्याने त्यांची कामे खोळंबून असल्याने आल्यापावली परतावे लागत आहे.
ऐरवी पदधिकारी नेहमी जिल्हा परिषदेत उपस्थित राहत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा लवाजमा व शासकीय कामे करणाऱ्यांची मोठी भाऊगर्दीने फुलण जाणारी जिल्हा परिषद आता निवडणुकीमुळे ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to the 'mini ministry' elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.