निर्णयाअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
By Admin | Updated: March 21, 2015 01:16 IST2015-03-21T01:16:25+5:302015-03-21T01:16:25+5:30
मार्च महिन्याच्या मध्यतरानंतर तापमान वाढत असल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवाने १६ मार्चपासून

निर्णयाअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
प्रशांत देसाई ल्ल भंडारा
मार्च महिन्याच्या मध्यतरानंतर तापमान वाढत असल्यामुळे राज्याच्या शिक्षण सचिवाने १६ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत अद्याप सुरू झालेल्या नाहीत. चार दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत शाळा सकाळपाळीत न घेण्याचा विषय चर्चेला आला होता. या निर्णयाला शिक्षण विभागाने विरोध केला नाही. परिणामी शाळा सकाळपाळीत सुरू न झाल्यामुळे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निर्णयात चिमुकले विद्यार्थी भरडले जात आहेत.
आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात बदल झाला आहे. मार्च महिन्याच्या उष्णतेच्या प्रखरतेचा विचार करुन शिक्षण सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळपाळीत घेण्याचे पत्र निर्गमित केले आहे. त्यानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू झालेल्या आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यातील शाळा याला अपवाद ठरलेल्या आहेत.
मार्च महिना तापू लागला असून उष्णतेमुळे अनेकांनी दुपारी घरातून बाहेर निघणे बंद केले आहे. कुलर व वातानुकुलित यंत्र सुरू झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्यात न आल्यामुळे पालकांमध्ये रोष पसरला आहे. याबाबत, शिक्षण विभागाने निरनिराळी कारणे पुढे केली आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता तपासणी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे सकाळपाळीत शाळा सुरू केल्यास दिवसभर शाळा बंद राहते यामुळे तपासणीच्या कार्यात अडथळा येणार होणार असल्यामुळे शाळा सकाळ पाळीत न करता सध्या दुपारपाळीतच सुरू ठेवण्यात येत असल्याचे कारण समोर केले आहे.
आरोग्यावर परिणाम
४सध्या ३४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळा कौलारू व कमी उंचीच्या असल्याने लवकर तापतात. काही शाळांची वीज जोडणी कापलेली असल्याने पंखे बंद आहेत. विद्यार्थी दिवसभर शाळेत असल्यामुळे त्यांना उन्हाच्या झळा बसत आहेत. पाण्याची भीषणता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सकाळी शाळेनंतर विद्यार्थी दिवसभर घरी एकटाच राहतो. त्याच्यावर लक्ष देण्यासाठी कोणीही नसल्याने जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे शाळा सकाळपाळीत घेऊ नये, असा ठराव घेण्यात आला. सभागृहाचा निर्णय बंधनकारक आहे. शिक्षण सचिवांचे पत्र प्राप्त झाले नसून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतल्या जातो.
- एकनाथ मडावी
शिक्षणाधिकारी (प्राथ.),
जिल्हा परिषद भंडारा.
ग्रामीण पालक रोहयोच्या कामावर जात असल्याने त्यांचे विद्यार्थी दिवसभर घरी राहतात. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते व क्वचितप्रसंगी त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण होतो. मार्चनंतर शाळा सकाळी सुरू करण्यात येईल. सध्या तापमानात वाढ झाली नाही. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली, परंतू ठराव घेण्यात आलेला नाही.
- रमेश पारधी
शिक्षण सभापती,
जिल्हा परिषद भंडारा.
जिल्ह्यातील तापमानात वाढ होत आहे. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडू शकतो. प्रखर उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा सामना करावा लागेल. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे शाळेतील पंखे बंद राहत असल्याने गर्मीत विद्यांना उकळावे लागणार. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहिल.
मुबारक सय्यद
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.