बारदानाअभावी धान खरेदी वांध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:24+5:302021-07-20T04:24:24+5:30
खरीप हंगामापासूनच धान खरेदीचे वांधे सुरू आहेत. बारदानाची मागणी प्रशासनाकडून केली जाते. मात्र शासनाकडून त्यास खो दिला जातो. त्यामुळे ...

बारदानाअभावी धान खरेदी वांध्यात
खरीप हंगामापासूनच धान खरेदीचे वांधे सुरू आहेत. बारदानाची मागणी प्रशासनाकडून केली जाते. मात्र शासनाकडून त्यास खो दिला जातो. त्यामुळे खरेदी केंद्रांना बारदान वेळेत मिळत नाही. ही समस्या जून महिन्यापासून जिल्ह्यातील शेतकरी व खरेदी केंद्र अनुभवत आहेत. एकदा वापरून झालेले बारदान मिलर्सकडे पडून आहेत. त्यातील सुस्थितीतील बारदान वापरायला शासन प्रशासनाकडून परवानगी का नाही, हा संशोधनाचा विषय आहे.
खरीप हंगामातील धानाची उचल वेळेत न झाल्याने उन्हाळी धानाचा खरेदी हंगामाला गुदामाची समस्या उभी होती. कशीबशी ही समस्या मार्गी लावीत उन्हाळी धान खरेदी सुरू केली. मात्र यातसुद्धा बारदानाची मोठी समस्या निर्माण झाली. मुदतवाढ एकदा नव्हे दोनदा दिली; परंतु बारदानच नाही तर या मुदतीचा फायदा काय, अशी विचारणा शेतकरी करीत आहेत. मे महिन्यात ऑनलाइन झालेले सातबारे अजूनही धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. यावरून धान खरेदीचा भोंगळ कारभार जिल्ह्यात ऐरणीवर आलेला आहे. जिल्हा पणन कार्यालयाकडून बारदान पुरवठ्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वारंवार सांगितले जाते; परंतु खरेदी केंद्रांना अपेक्षित बारदान मिळत नसल्याने शेतकरी व खरेदी केंद्र आपापसांत भांडणे करीत आहेत. यावर प्रशासनाच्या वतीने तत्काळ तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बॉक्स
पालांदूर परिसरातील तीन धान खरेदी केंद्रांना बारदान मिळणार असल्याचा मेसेज पुरविण्यात आल्याची माहिती आहे. हैदराबाद येथून बारदान घेऊन ट्रक सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचणार असल्याचा संदेश खरेदी केंद्रांना मिळाला होता; परंतु हे बारदान जिल्ह्यातील एका तालुक्याला वळता करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जेवणाळा, मेंगापूर, पळसगाव खरेदी केंद्रांवर बारदानाचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांचा शासन, जिल्हा पणन कार्यालय व खरेदी केंद्रांवर मोठा रोष आहे.
मेंगापूर येथे बारदानाअभावी खरेदीप्रक्रिया प्रभावित झालेली आहे. ५८० शेतकऱ्यांचे सातबारे ऑनलाइन असून त्यापैकी २२० शेतकऱ्यांचे धान मोजणी झालेले आहेत. ३६० शेतकरी अजूनही मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. जूटच्या बारदानात धान मोजणीला जिल्हा पणन कार्यालयाने सांगितलेले आहे. उद्यापासून खरेदी सुरू केली जाईल.
- निखिल खंडाईत, ग्रेडर, मेंगापूर, ता. लाखनी