देव्हाडीत कृत्रिम भारनियमनाने पाणीटंचाई
By Admin | Updated: July 3, 2016 00:24 IST2016-07-03T00:24:43+5:302016-07-03T00:24:43+5:30
देव्हाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला. विहिरीचा उपसा ग्रामपंचायतीने केला नाही.

देव्हाडीत कृत्रिम भारनियमनाने पाणीटंचाई
जलवाहिनीला गळती : नियोजनाचा अभाव, ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
तुमसर : देव्हाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला. विहिरीचा उपसा ग्रामपंचायतीने केला नाही. मुख्य जलवाहिनी वारंवार फूटत असल्याने नागरिकांना महिन्याभरापासून केवळ एकच वेळ पाणी मिळत आहे. पाणी वितरीत करताना जून्या वस्तीत अधिक वेळ पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतीमध्ये नियोजनाचा अभाव आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
देव्हाडी गावाची लोकसंख्या सुमारे साडे सहा हजाराच्यावर आहे. तालुक्याची सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. तुमसर-गोंदिया राज्य महामार्ग व मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर वसले आहे. वैनगंगा नदी येथून केवळ तीन कि़मी. अंतरावर आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गोंदिया मार्गावर आहे. सुमारे ३० वर्षापुर्वी ग्रामपंचायतीने येथे विहीर बांधकाम केले होते. गाव दोन भागात विभागले गेले आहे.
मागील एका महिन्यापासून येथे नागरिकांना केवळ सकाळी पाणी देण्यात येते. विहिरीने तळ गाठला आहे. पाच वॉर्डात पाणी वितरीत करण्याच्या वेळा ग्रामपंचायतीने निश्चित केल्या आहेत. जून्या वस्तीत मात्र बराच वेळ पाणी देण्यात येते. येथे दूजाभाव करण्यात येत आहे. सायंकाळी येथे महिलांना विहिरीतून पाणी काढावे लागते. विहीरीत पाण्याचे स्त्रोत आहेत, परंतु ग्रामपंचायतीने विहीरीतील गाळ काढला नाही. त्यामुळे पाण्याचा येवा विहीरीत येत नाही.
उड्डाणपूल बांधकाम करताना येथे मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळेही पाणी नागरिकांना मिळाले नाही. देव्हाडीवासीयांना दररोज ५० हजार लिटर पाणी लागते. ग्रामपंचायतीने येथे नियोजन न केल्याचे दिसून येते. ग्रामविकास अधिकारी दर्जाचे कर्मचारी येथे कार्यरत आहे. परंतु येथे नियोजनशुन्य कारभारामुळे नागरीक त्रस्त दिसत आहेत.(तालुका प्रतिनिधी)